पुणे येथे सोळाव्‍या ‘पं. जितेंद्र अभिषेकी महोत्‍सवा’चे आयोजन

पं. जितेंद्र अभिषेकी

पुणे, १४ मार्च (वार्ता.) – पं. जितेंद्र अभिषेकी यांच्‍या कार्याचा ठेवा पुढील पिढीला कळावा, या उदात्त हेतूने यंदा १६ व्‍या ‘पं. जितेंद्र अभिषेकी महोत्‍सवा’चे आयोजन २४ ते २६ मार्च या कालावधीत यशवंतराव चव्‍हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे करण्‍यात आले आहे. हा महोत्‍सव सर्वांकरता विनामूल्‍य असणार, अशी माहिती सुप्रसिद्ध गायक श्री. शौनक अभिषेकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा महोत्‍सव माजी नगरसेवक उज्‍ज्‍वल केसकर, ‘आपला परिसर आणि तरंगिणी सांस्‍कृतिक प्रतिष्‍ठान’ यांनी आयोजन केले आहे. या वेळी ‘पं. जितेंद्र अभिषेकी जीवन गौरव पुरस्‍कार’ ख्‍यातकीर्त गायिका सौ. आशाताई खाडीलकर, तर ‘पं. जितेंद्र अभिषेकी स्‍मृती युवा पुरस्‍कार’ श्री. आदित्‍य खांडवे यांना प्रदान करण्‍यात येणार आहे. या ३ दिवसांमध्‍ये अनेक मान्‍यवरांचे गायन, वादन आणि नृत्‍यांचे आविष्‍कार सादर केले जातील. तसेच २५ आणि २६ मार्च या दिवशी सकाळी ‘युवोन्‍मेष’ या कार्यक्रमात नवीन, युवा कलाकार स्‍वत:ची गायनकला, संगीतकला, वाद्यकला सादर करतील.