शासकीय कर्मचार्‍यांकडून जुनी पेन्शन योजना चालू करण्याची मागणी

  • जिल्ह्यातील बेमुदत संपात सहस्रो शासकीय कर्मचार्‍यांचा सहभाग 

  •  राजापूर आणि मंडणगड येथे १०० टक्के कर्मचारी संपावर

रत्नागिरी – शासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना चालू करावी, या मुख्य मागणीसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपात जिल्ह्यात अनुमाने १५ सहस्र कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला आहे. हा संप राजापूर आणि मंडणगड तालुक्यात शंभर टक्के यशस्वी झाल्याचे संघटनेनेे म्हटले आहे.

सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत,  कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी, समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सध्याची एन्.पी.एस्. पेन्शन योजना रहित करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही मुख्य आणि तसेच अन्य प्रलंबित १० मागण्यांसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे.

रत्नागिरीत या संपात प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षक शाळेत नसल्याने शाळेच्या बाहेर शाळेला सुट्टी असल्याचा फलक लावण्यात आला होता. शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचार्‍यांनी निदर्शने केली. या वेळी एकच मिशन जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे आणि अन्य घोषणा देण्यात आल्या.

मंडणगड तालुक्यात या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे, असे म्हटले जात आहे; मात्र येथील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक वगळता सर्व स्तरातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. येथील ११ कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्याकडे त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

खेड येथील सहस्रो कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आंदोलकांकडून निदर्शने आणि  घोषणाबाजी करण्यात आली.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ, दापोली कर्मचारी समन्वय संघाकडून विद्यापिठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या संपात सक्रीय सहभाग घेऊन राज्यव्यापी संपास पाठिंबा देत असल्याचे निवेदन कुलसचिवांना देण्यात आले.