पुणे – राज्यातील सरकारी कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि विविध शासकीय कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून १० मार्चला राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सरकारी कर्मचार्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांना निवेदन दिले.
या वेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष मारुति शिंदे, आरोग्य विभागातील नंदकुमार गुडमेट्टी, संजय कडाळे, ससून रुग्णालयातील दिनेश कुचेकर, पाटबंधारे विभागातील कृष्णा साळवी, सहकार विभागातील संध्या काजळे, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील विनायक राऊत, निर्मला चौधरी, आशा बांदल आदी विविध विभागांतील कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.