गोवा : भगवान महावीर अभयारण्यातही पोचली आग !

  • सुर्ला-१ आणि सुर्ला-२ या भागांत मोठी आग !

  • आगीच्या दुर्घटनांची माहिती घेण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर

  • आगीमुळे झालेल्या जैवविविधतेच्या हानीची अद्याप नोंद नाही !

पणजी, ११ मार्च (वार्ता.) – म्हादई अभयारण्यासह आता भगवान महावीर अभयारण्यातही आगीचा भडका उडाल्याने जैवविविधतेची अपरिमित हानी झाली आहे. येथील पशू-पक्ष्यांसह वन्य प्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. भगवान महावीर अभयारण्यातील जंगलात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर साहाय्यक वनरक्षक अमित गेमावत, उपवनपाल आनंद जाधव, मोले वनाधिकारी सिद्धेश नाईक, मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, सरपंच प्रिया खांडेपारकर यांनी फोंडा अग्नीशमन दलाच्या बंबासह घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.

म्हादई अभयारण्यात पुन्हा मोठी आग

आग विझवण्यासाठी नौसेनेच्या हेलिकॉप्टरचे साहाय्य

म्हादई अभयारण्यात सुर्ला-१ आणि सुर्ला-२ या भागांत मोठी आग लागली आहे. सुर्ला-१ येथे खातकोण भागात आगीने रौद्ररूप धारण केले असून, ही आग विझवण्यासाठी नौसेनेच्या हेलिकॉप्टरचे साहाय्य घेण्यात येत आहे. ११ मार्च या दिवशी सकाळी वाघेरी डोंगराजवळ असलेल्या बाळकृष्ण सावंत यांच्या काजू बागायतीला आग लागली. या आगीत काजू बागायतीची मोठी हानी झाली आहे. ही बागायत जंगल भागात असून लोकवस्तीपासून पुष्कळ लांब आहे. सकाळी धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी बागायतीकडे धाव घेतली.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून आगीच्या प्रत्येक घटनेचे अन्वेषण करण्याचा आदेश

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयाने गोव्यातील संबंधित उप वनसंरक्षकांना (‘डी.सी.एफ्.’ना) ५ मार्चपासून गोव्यात घडलेल्या आगीच्या प्रत्येक दुर्घटनेचे सखोल अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत. आगीच्या दुर्घटना या मानवनिर्मित आहेत. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी २४ घंटे कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे, तर ७५० व्यक्ती आग नियंत्रणात आणण्यासाठी झुंजत आहेत. भारतीय नौदल आणि भारतीय वायूसेना यांची २ हेलिकॉप्टर्स सातत्याने आगीच्या घटनांवर देखरेख ठेवून आहेत. आगीच्या दुर्घटनांची माहिती घेण्यासाठी ‘ड्रोन’चाही वापर करण्यात येत आहेत. वन क्षेत्रांमध्ये अनधिकृत प्रवेशावर बंदी घालण्यासह वनक्षेत्रातील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानुसार वनक्षेत्रात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याची नोंद अद्याप झालेली नाही.

वनक्षेत्राला आग लावल्याच्या प्रकरणी कोपर्डे, वाळपई येथील नागरिक पोलिसांच्या कह्यात

वाळपई पोलिसांनी वनक्षेत्राला आग लावल्याच्या प्रकरणी पहिल्यांदाच कारवाई करतांना कोपर्डे, वाळपई येथील नागरिक एकनाथ सावंत यांना कह्यात घेतले आहे. वन खात्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी या प्रकरणी अन्वेषणासाठी गुन्हे अन्वेषण विभाग आणि ‘फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी’ यांचेही साहाय्य घेतले आहे. आग लावल्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेचे अधिक अन्वेषण केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.