पाकिस्तानच्या ‘नॅशनल डे परेड’वर बिकट आर्थिक स्थितीचे सावट !

इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारने २३ मार्चला साजरी होणारी ‘नॅशनल डे परेड’ राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परेड केवळ प्रतिकात्मक असेल. या वेळी कुठल्याही विदेशी पाहुण्याला निमंत्रित केले जाणार नाही. ‘नॅशनल डे परेड’मध्ये पाकिस्तानी सैन्य त्याचे सामर्थ्य दाखवत असते.

१. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सरकारी उधळपट्टी थांबवण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले होते. शाहबाज यांनी नुकतेच सांगितले होते की, देशाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी सरकार कठोर निर्णय घेणार आहे.

२. पाकिस्तानची ‘नॅशनल डे परेड’ काही प्रमाणात भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसारखीच असते. प्रतिवर्ष २३ मार्चला हा सोहळा इस्लामाबादमधील शकरपरिया या सर्वांत मोठ्या मैदानात होतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विदेशातील प्रसिद्ध नेत्यांना निमंत्रित केले जात असत.