‘जोतिबा देवस्थान’ या न्यासाच्या भूमीची विक्री झाल्याची नोंद नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विधानसभा तारांकित प्रश्न

श्री जोतिबा देवस्थान

मुंबई – कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग १ आणि वर्ग २ यांच्याकडून अहवाल मागवले. त्यामध्ये त्यांनी ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणार्‍या ‘जोतिबा देवस्थान’ या न्यासाच्या भूमीची कोणतीही विक्री झाल्याची नोंद आढळून येत नाही’, असे नमूद केले आहे, असे लेखी उत्तर गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नावर दिले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील आणि आमदार धनंजय मुंडे, तसेच भाजपचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी ‘कोल्हापूर जिल्ह्यातील श्री जोतिबा देवस्थानची शेकडो एकर भूमी परस्पर विकल्याचा प्रकार जानेवारी २०२३ मध्ये निदर्शनास आला होता. हे खरे आहे का ?, तसेच या प्रकरणी शासन अन्वेषण करत आहे का ?’, असा प्रश्न विचारला होता.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणार्‍या देवस्थानच्या भूमीचा शोध घेण्यासाठी ‘सार आयटी रिसोअर्सेस प्रा. लि.’ या आस्थापनाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशीही माहिती या उत्तरात देण्यात आली आहे.