(म्हणे) ‘खलिस्तानची निर्मिती झाली, तर अमृतसर राजधानी असेल !’ – पाकमधील खलिस्तान समर्थक

पाकमधील खलिस्तान समर्थकाची गरळओक

पाकमधील खलिस्तान समर्थक

इस्लामाबाद – खलिस्तान निर्माण झाला, तर त्याची राजधानी लाहोरऐवजी पूर्व पंजाबमधील अमृतसर असेल, असा दावा पाकमधील खलिस्तान समर्थकाने केला आहे. (पाकमध्ये शिखांचे धर्मगुरु गुरु गोविंदसिंह यांच्या काळातील अनेक गुरुद्वारा आहेत. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणार्‍यांमध्ये पाकच्या कह्यातील हे गुरुद्वारा सोडवण्याची धमक आहे का ? याविषयी ते कधी का बोलत नाहीत ? – संपादक) पाकिस्तानमध्ये असे अनेक लोक आहेत जे खलिस्तानचे समर्थन करतात आणि स्वत:ला ‘शिखांविषयी सहानुभूती वाटणारे’, असे म्हणवून घेतात. (पाक शिखांना भारताच्या विरोधात भडकावत आहे. हे सत्य खलिस्तानवादी शिखांना उमगेल तो सुदिन ! – संपादक) या खलिस्तानवादी समर्थकाचे नाव समजलेले नाही.

भारतातील शिखांच्या ‘तहरीक-ए-आझादी’ला पाकिस्तानचा पूर्ण पाठिंबा होता. ‘सध्या खलिस्तानी शीख आणि पाकिस्तान भारताच्या विरोधात आहेत. शिखांनी अण्वस्त्रधारी पाकला स्वतःचा मित्र मानून भारताच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे’, असे फुकाचे आवाहनही या व्यक्तीने केले आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे ते दिवसेंदिवस उद्दाम होत चालले आहेत. त्यांना आताच रोखले नाही, तर भविष्यात ते भारताच्या सुरक्षेसाठी डोकेदुखी बनतील, हे सुरक्षायंत्रणा लक्षात घेतील का ?