गोवा : उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा १२ वाजता सुटल्या !

पणजी, ९ मार्च (वार्ता.) – राज्यात उष्णतेच्या लाटेची नोंद घेऊन शिक्षण खात्याने ९ आणि १० मार्च या दिवशी शाळा १२ वाजेपर्यंत सोडाव्यात, असा आदेश काढला आणि ९ मार्च या दिवशी बहुतांश शाळा १२ वाजता सोडण्यात आल्या. राज्यात १ सहस्र ७०० विद्यालयांमध्ये इयत्ता १ली ते इयत्ता १२ वीपर्यंत सुमारे २ लाख ७० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

हवामान विभागाने राज्यात उष्म्याच्या लाटेची चेतावणी दिली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत समुद्रकिनारी भागातील तापमान हे समुद्रावरून वहाणार्‍या खार्‍या वार्‍यावर अवलंबून असते. हे वारे सर्वसाधारणपणे सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत स्थिर होत असते; मात्र हे वारे उशिरापर्यंत वाहू लागल्यास किनारपट्टीचा भाग आणि लगतचा प्रदेश यांमधील तापमान झपाट्याने वाढते. ८ मार्च या दिवशी हे वारे उशिरा वाहू लागल्याने तापमान झपाट्याने वाढले. तापमानाची ३८.४ अंश सेल्सिअस अशी उच्चांकी नोंद झाली. त्याचा परिणाम उष्म्याच्या लाटेत झाला होता; मात्र ९ मार्च या दिवशी समुद्रात वहाणारे खारे वारे वेळेत चालू झाल्याने राज्यातील बहुतांश भागाचे तापमान वाढलेले असले, तरी ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. सर्वसाधारणपणे ३७ अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यास आणि ते नेहमीच्या तापमानापेक्षा ६ अंश अधिक नोंदवले गेल्यास आणि आर्द्रतेचे प्रमाण कमालीचे घटल्यास उष्म्याची (हिट वेव्ह) शक्यता असते. पणजी येथे ८ मार्च या दिवशी मार्च मासातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. पणजी येथे ८ मार्च या दिवशी नियमित तापमानापेक्षा ६ अंश अधिक तापमानाची नोंद झाली होती.

पुढील आठवड्यात पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता

हवामान विभागाने पुढील आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून यामुळे गोमंतकियांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन २ आठवड्यांचा हवामानाचा अंदाज वर्तवला असून यामध्ये १५ मार्चच्या आसपास गोव्यात अल्प प्रमाणात पाऊस पडून राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.