अर्थसंकल्पातील विविध स्तरांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी !

शिवराज्याभिषेक महोत्सव आणि गड-दुर्ग संवर्धन यांसाठी ६५० कोटी रुपयांचा निधी !

२ ते ९ जून २०२३ या कालावधीत होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकासाठी अर्थसंकल्पामध्ये ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी गडावर महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारणे आणि शिवकालीन गडांचे संवर्धन करणे यांसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासह आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यासाठी ५० कोटी रुपये निधी घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, अमरावती, नाशिक, संभाजीनगर, नागपूर येथे दृकश्राव्य माध्यमाच्या सुविधा असलेली उद्याने विकसित करून त्या ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जीवनगाथा’ प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यासाठी २५० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.


महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आणि तीर्थक्षेत्र यांच्या विकासासाठी ३०० कोटींची तरतूद !

पुणे येथील प्राचीन ज्योतिर्लिंग भीमाशंकर, तसेच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर, संभाजीनगर येथील घृष्णेश्वर, हिंगोली येथील औंढा नागनाथ, बीड येथील वैजनाथ हे ज्योतिर्लिंग, तसेच राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन यांसाठी अर्थसंकल्पामध्ये ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अन्य धार्मिक कार्यासाठी भरीव तरतूद !

यासह वाशिम येथील पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज यांच्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण स्थापन करून ५० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. बीड येथील गहिनीनाथ गडाचे संवर्धन आणि विकास यांसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताई यांच्या निर्मलवारीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्रीसंत जगनाडे महाराज यांचे मावळ (पुणे) येथील समाधीस्थळ विकसित करण्यासाठी आणि नागपूर येथे ‘श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी’ उभारण्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शासन करणार कीर्तनकारांचा सन्मान !

प्रतिकात्मक छायाचित्र

व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, तसेच शिक्षणादी क्षेत्रातील मौलिक कामगिरीद्वारा राष्ट्रचरित्र घडवण्याच्या कार्यातील योगदान लक्षात घेऊन शासन कीर्तनकारांच्या सन्मानासाठी ‘श्रीसंत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना’ राबवणार आहे. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील स्मारकासाठीही शासन निधी उपलब्ध करून देणार आहे.


छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीरच’…

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान स्थळ मौजे तुळापूर (तालुका हवेली, जिल्हा पुणे) आणि समाधी स्थळ वढु (बु.) तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील स्मारकाच्या अनुमाने २७० कोटी रुपये किमतीच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून महाराजांच्या पराक्रमाला साजेसे स्मारक निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सरकारने म्हटले आहे. अर्थसंकल्पात ही माहिती देतांना सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ असे संबोधले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर न म्हणता ‘स्वराज्यरक्षक’ असे म्हटले होते.

या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ म्हणून शिंदे-फडणवीस यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.


शेतकर्‍यांसाठी विशेष तरतुदी !

१. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या ३ वर्षांत राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्यात येणार आहे. यासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

२. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या विमा हप्त्याची २ टक्के रक्कम राज्यशासनाकडून भरण्यात येणार आहे. यासाठी वर्षाला ३ सहस्र ३१२ कोटी रुपये तरतूद केली आहे.

३. शेती उत्पादनांना योग्य दर प्राप्त होण्यासाठी ‘एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा सिद्ध’ करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘महाकृषीविकास अभियान’ योजना सरकारने घोषित करून ५ वर्षांसाठी ३ सहस्र कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहेत.

४. तृणधान्य उत्पादन वाढीसाठी ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ घोषित करून त्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी सोलापूर येथे ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे.

५. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी शेतकर्‍यांच्या निवासासाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ बांधण्यात येणार आहे. येथे शेतकर्‍यांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

६. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना १२ सहस्र रुपयांचा सन्माननिधी देण्यात येईल.


‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून प्रतिवर्षी १२ सहस्र रुपये मिळणार !

केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी’मध्ये भर घालून राज्यशासनाकडून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ घोषित करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रशासनाकडून प्राप्त होणार्‍या ६ सहस्र रुपयांमध्ये आणखी ६ सहस्र रुपये घालून प्रत्येक वर्षी शेतकर्‍यांना १२ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत. राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. वर्ष २०२३-२४ साठी यात ६ सहस्र ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


पीडित महिलांच्या साहाय्यासाठी राज्यात ५० शक्ती सदन उभारण्यात येणार !

अडचणीत सापडलेल्या, लैंगिक शोषण झालेल्या, कौटुंबिक समस्याग्रस्त आदी पीडित महिलांसाठी केंद्रशासनाकडून राबवल्या जाणार्‍या ‘स्वाधार’ आणि ‘उज्ज्वला’ या योजना एकत्रित करून महाराष्ट्रात ‘शक्ती सदन’ योजना राबवण्यात येणार आहे. पीडित महिलांना आश्रय देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी ५० शक्ती सदने उभारून महिलांना कायदेशीर, आरोग्यविषयक साहाय्य आणि समुपदेशन आदी सेवा दिल्या जाणार आहेत. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानाच्या अंतर्गत ४ कोटी महिला आणि मुली यांना आरोग्य सुविधा आणि औषधोपचार दिला जाणार आहे.

‘लेक लाडकी’ योजनेतून मुलींना ७५ सहस्र रुपये अनुदान !

जन्मानंतर मुलीला ५ सहस्र रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ४ सहस्र रुपये, सहावीत गेल्यावर ६ सहस्र, अकरावीत ८ सहस्र, तर मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ सहस्र रुपये मिळणार


गोवंश आयोग स्थापन होणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यात देशी गोवंशियांचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’ची स्थापना करण्यात येणार आहे. देशी गोवंशाची अधिकाधिक उत्पत्ती करण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे, तसेच नगर येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. दूध उत्पादनासाठीही विशेष संशोधन करण्यात येणार आहे.


मराठीच्या प्रचारासाठी राज्यात मराठी भाषा युवक मंडळांची स्थापना होणार !

मराठीचा प्रचार आणि प्रसार यांसाठी शासन मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करणार आहे. यासाडी वाई (सातारा) येथे मराठी भाषेचे विश्वकोश कार्यालय, तसेच ऐरोली (नवी मुंबई) येथे मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. चक्रधर स्वामी यांनी मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला त्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे शासन मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार आहे.


आरोग्यविषयीच्या योजना

१. ‘महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजने’त आता ५ लाखांपर्यंत उपचार

२. राज्यभरात ७०० ठिकाणी ‘स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उभारणार

३. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करणार


धार्मिक आणि औषधी वृक्षांच्या निर्मितीला शासनाकडून प्रोत्साहन !

प्रत्येक शहरात धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि औषधी वृक्ष यांच्या निर्मितीसाठी राज्यशासन अमृत वन उद्यानांची निर्मिती करणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात पर्यावरणपूरक कडुनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल या ५ वृक्षांच्या लागवडीतून पंचायतन निर्माण करण्यात येणार आहे. यासह धार्मिक स्थळांच्या परिसरात देवराईंची निर्मिती करण्यात येणार आहे. औषधी, शोभिवंत आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांच्या प्रजाती निर्मितीसाठी आधुनिक ५० रोपवाटीकांची निर्मिती राज्यशासन करणार आहे.


सांगली येथील नाट्यगृहासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद…

सांगली येथे नवीन नाट्यगृहाच्या बांधकामासाठी २५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपये राखून ठेवण्यात येतील.


अन्य तरतुदी

१. धनगर समाजाला १००० कोटी रुपये देणार आणि ‘महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळा’ची स्थापना करणार.

२. मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी ५० कोटींचा मत्स्यविकास कोष, विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा देणार

३. मोठ्या प्रमाणात नदीजोड प्रकल्प राबवणार

४. सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणार

५. मराठवाडा वॉटरग्रीड’चे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठवले

६.‘जलजीवन मिशन’अंतर्गत १७.७२ लाख कुटुंबांना नळजोडणी आणि त्यासाठी २० सहस्र कोटी रुपये !

७. ‘जलयुक्त शिवार २.०’ ५ सहस्र गावांमध्ये चालू होणार !

८. विविध ठिकाणच्या रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद केली असून मुंबई मेट्रोच्या पुढील प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध केला आहे.

९. १०० बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी, विमानतळांचा विकास होणार

१०. मुंबईच्या सुशोभिकरणासाठी १ सहस्र ७२९ कोटी रुपयांची तरतूद

११. विद्यार्थ्यांना भरीव शिष्यवृत्ती, गणवेशही विनामूल्य मिळणार


महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचा तांत्रिक आणि वित्तीय अहवाल सिद्ध होत आहे !

वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी असा नागपूर-गोवा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात ‘महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गा’चा तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यता अहवाल सिद्ध होत आहे. ७६० कि.मी.च्या या महामार्गामुळे माहुर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही २ ज्योर्तिंलिंगे नांदेड येथील तख्त सचखंड श्रीहुजूर साहिब गुरुद्वारा, महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठल रुखमाईचे पंढरपूर, तसेच कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही तीर्थस्थळेही जोडली जातील. हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अशा ६ जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग मराठवाड्यातील अर्थकारणाला भक्कम पाठबळ देणार आहे. या प्रकल्पासाठी ८६ सहस्र ३०० कोटी रुपये व्यय अपेक्षित आहे.

अर्थसंकल्प सादर करतांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग म्हटले !

अर्थसंकल्प सादर करतांना देवेंद्र फडणवीस आणि दीपक केसरकर यांनी संत ज्ञानेश्वरांचा अभंग वाचून दाखवला. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ‘दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ।।’ हा या अर्थसंकल्पाचा प्रासादिक संदेश आहे आणि तीच आमची प्रामाणिक भावना आहे’, असे त्यांनी या वेळी सांगितले.