फाल्गुन कृष्ण द्वितीया (९.३.२०२३) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त नागपूर येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती ९ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर करा : https://sanatanprabhat.org/marathi/660733.html
६. सौ. अश्विनी जयंत दळवी, नागपूर
अ. ‘साधना म्हणजे काय ?’, हे मला ठाऊक नव्हते. पू. पात्रीकरकाकांनी मला मार्गदर्शन केले. त्यामुळेच मी साधनेला आरंभ केला.’
७. एक साधिका, नागपूर
७ अ. सहलीला जाऊन आल्यावर मुलीला स्वप्न पडून भीती वाटणे आणि तिला हनुमानाचा जप करायला सांगून स्वतःही तिच्या डोक्यावर हात ठेवून तो जप करणे : ‘माझी मुलगी ३ वर्षांपूर्वी राजस्थान येथे शालेय सहलीसाठी गेली होती. सहलीला जाऊन आल्यानंतर तिला विशिष्ट प्रकारचे स्वप्न पडायचे आणि ती पुष्कळ घाबरून झोपेतून जागी व्हायची. स्वप्न पडण्याच्या भीतीमुळे तिला ‘पोटात दुखणे आणि दम लागणे’, असे त्रास होऊ लागले. ‘विकार-निर्मूलनासाठी नामजप’ या ग्रंथात सर्व प्रकारची भीती जाण्यासाठी ‘श्री हनुमते नमः।’ हा नामजप सांगितला आहे. त्यानुसार मी तिला तो नामजप करायला सांगितला. मी स्वतः तिच्या डोक्यावर हात ठेवून तो नामजप करायचे आणि तिला मारुतिस्तोत्र म्हणून झोपायला सांगायचे.
७ आ. स्वप्न पडल्यावर मुलीने त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच प्रयत्न करणे, याविषयी पू. काकांना सांगितल्यावर त्यांनी ‘तिची अंतर्गत साधना चालू आहे’, असे सांगणे आणि त्यानंतर तिला ते स्वप्न पडणे बंद होणे : काही दिवसांनी ती मला झोपेतून जागे करून ‘पुन्हा ते स्वप्न पडले’, असे सांगायची आणि ‘तू झोप’, असे म्हणून स्वतःच त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी नामजपाचे उपाय करून स्वतःला सावरायची. मी याविषयी पू. काकांना सांगितले. तेव्हा पू. काका म्हणाले, ‘‘अरे वा ! चांगले आहे. ती स्वतःला सांभाळू शकते, म्हणजे तिची अंतर्गत साधना चालू आहे.’’ त्यानंतर तिला ते स्वप्न पडणे पूर्णपणे बंद झाले. जेव्हा तिला हे स्वप्न पडायचे, तेव्हा आरंभी ती फार घाबरायची. आता ती एकटी दुसर्या खोलीत झोपते. तिला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही.’
८. श्री. अतुल आर्वेन्ला, नागपूर
८ अ. पू. पात्रीकरकाकांनी भावार्चना घ्यायला सांगून त्यातील आनंद अनुभवायला देणे आणि आत्मविश्वास निर्माण करणे : ‘एकदा पू. काकांनी मला सत्संगात भावार्चना सांगण्यास सांगितली. तेव्हा माझ्या मनाचा संघर्ष झाला. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आळवून भावार्चना सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी प्रथमच भावार्चना सांगितली आणि मला पुष्कळ आनंद मिळाला. माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले. तेव्हा पू. काका मला म्हणाले, ‘‘कोण म्हणते, ‘तुला भावप्रयोग घेता येत नाही आणि तुझ्यामध्ये भाव नाही ?’’
८ आ. पू. पात्रीकरकाका सर्व साधकांशी अगदी सहजपणे बोलतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना कुठलाही वेगळेपणा जाणवत नाही.
८ इ. पू. काकांच्या मार्गदर्शनामुळे व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यात पुष्कळ साहाय्य होणे : मला प्रतिदिन पू. काकांच्या माध्यमातून चैतन्य ग्रहण करण्याची संधी मिळते. ‘आमचे व्यष्टी अन् समष्टी साधनेचे प्रयत्न कुठे न्यून पडत आहेत आणि ते कसे वाढवायला पाहिजेत ?’, हे आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळते. पू. काका करत असलेल्या चैतन्याच्या स्तरावरील मार्गदर्शनामुळे व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यात पुष्कळ साहाय्य होते.
८ ई. पू. काकांना ‘आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि प्रत्येक साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी तळमळ असणे : पू. काका सर्व साधकांना पुढे येणार्या आपत्काळाची जाणीव करून देतात आणि ‘आता व्यावहारिक विचार अधिक न करता आपण केवळ साधनाच केली पाहिजे’, असे पुष्कळ तळमळीने सांगतात. ‘आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि प्रत्येक साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी पू. काकांची पुष्कळ तळमळ असते.
८ उ. पू. काकांकडून एखादे सूत्र सांगायचे राहिले, तर ते प्रांजळपणे सर्वांसमोर स्वतःची चूक सांगतात.
‘गुरुदेवांच्याच कृपेने आम्हाला पू. काकांचा सत्संग मिळतो’, यासाठी आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
९. कु. वेदांगी जयंत दळवी (वय १२ वर्षे), नागपूर
९ अ. पू. काकांच्या सत्संगात आनंद जाणवणे : ‘जेव्हा पू. काका आमच्या घरी येतात, तेव्हा मला घरात पुष्कळ आनंद जाणवतो. अन्य वेळी मी बाहेर खेळायला जाते; पण पू. काका घरी असतांना मला त्यांच्या समवेत रहायला आवडते.
९ आ. पू. काकांनी ‘इतरांना खाऊ देऊन मग स्वतः खाऊ खायला हवे’, हे शिकवणे : एकदा पू. काकांनी माझ्यासाठी आठवणीने काजूकतली आणली होती. यातून ‘पू. काकांचे लहान मुलांकडेही लक्ष असते’, हे माझ्या लक्षात आले. त्यांनी मला सांगितले, ‘‘सर्वांना १ – १ वडी देऊन मग तू खा !’’ त्याप्रमाणे मी कृती केली. यातून पू. काकांनी मला ‘प्रथम सर्वांना खाऊ देऊन नंतर स्वतः खायला हवे’, हे शिकवले.’ (समाप्त)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २१.६.२०२१)
|