मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतपिकांच्या हानीची भरपाई शासनाने घोषित करावी, अशी मागणी करत ८ मार्च या दिवशी विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हानीचे पंचनामे झाल्यावर त्वरित साहाय्य घोषित करण्यात येईल’, असे आश्वासन दिले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चर्चा करण्याचे आश्वासन देऊन सभागृहाचे पुढील कामकाज चालू केले या वेळी विरोधकांनी सभात्याग केला.
विधीमंडळाच्या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या हानीविषयी चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची अनुमती मागितली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही अशीच मागणी केली.
विरोधकांची शेतकर्यांविषयीची कणव, हे मगरीचे अश्रू ! – देवेंद्र फडणवीस
विरोधकांची शेतकर्यांविषयीची कणव, हे ‘मगरीचे अश्रू’ आहेत. विरोधक शेतकर्यांच्या प्रश्नी राजकारण करत आहेत. महाविकास आघाडीच्या काळातील अनुदान शेतकर्यांना आम्ही दिले. आतापर्यंत आम्ही ७ सहस्र कोटी रुपयांचे वाटप केले आहे. ‘नाफेड’च्या माध्यमातून कांद्याची खरेदी चालू आहे. त्याची आकडेवारीही आम्ही विरोधकांना दिली आहे. सरकार शेतकर्यांच्या पाठीशी राहील, तसेच त्यांना साहाय्य करील. विरोधकांचा सभात्याग हे केवळ राजकारण आहे.