देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे होऊन गेली. आपण सर्व भारतीय नागरिक मोठ्या आनंदाने ‘स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी’ वर्ष साजरे करत आहोत; पण ‘खरोखरच देशाला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेे आहे का ?’, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारून बघूया. देश जरी स्वतंत्र झाला असला, तरी या देशाची स्त्री मात्र अजूनही स्वतंत्र झालेली दिसत नाही. आपण सर्वच जण प्रतिदिन बातम्या वाचतो आणि ऐकतो, त्यात देशांच्या अनेक कानाकोपर्यातून हृदय पिळवटून टाकणार्या स्त्री अत्याचाराच्या घटना समोर येतात. देशात महिलांवर होणार्या बलात्काराचे सत्र तर चालूच आहे की, जो एक कायदेशीर गुन्हा आहे. याला केवळ प्रशासनच नव्हे, तर आपण स्वतःसुद्धा तितकेच उत्तरदायी आहोत.
१. स्वतःच्या रक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवण्याची मागणी करा !
आपण आपल्या मुलींना फक्त अपमान सहन करून जगायला शिकवतो, त्यांना लढायला प्रोत्साहित करतच नाही. ‘नातेवाईक आणि समाज काय म्हणेल ?’, म्हणून त्यांचे बोलणेच बंद करतो. एकदा प्रवास करत असतांना रेल्वेत एक व्यक्ती माझ्याकडे वाईट नजरेने बघत असतांना माझ्या आईने मला मान खाली घालून गप्प बसायला सांगितले. जर तिने मला त्याच क्षणी त्याला वैध मार्गाने योग्य धडा शिकवण्यास सांगितले असते, तर त्यानंतर त्या व्यक्तीने कुठल्याही मुलीवर तशी दृष्टी टाकलीच नसती. इथेच आपण चुकतो. कुठे अत्याचार झाला की, आपण लगेच न्यायाची भीक मागायला आणि मोर्चे काढायला जातो. तसे करायलाच हवे; पण आपण प्रशासनाकडे संरक्षणाची भीक मागण्यापेक्षा स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाची भीक का मागत नाही ? आपल्या मुलींसाठी अशी भीक की, जेणेकरून ती स्वतःचे रक्षण स्वतः करू शकेल.
२. स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती
पुराण आणि कथा यांमधून कळते की, महिषासुर राक्षस सुद्धा आदिशक्ती पार्वतीदेवीचा आसुरी वृत्तीने अत्याचार करण्यास आला होता. आदिशक्तीने तिच्या स्वबळाने आणि शस्त्राने त्याचा संहार केला. आपणही कलियुगातील आदिशक्ती स्वरूपच आहोत; परंतु आपल्याकडे ना स्वबळ आहे ना शस्त्र. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वबळाचे अनुमान येत नाही. जेव्हा आपल्याला आपल्या शक्तीचा अनुभव होईल, तेव्हा आपल्यापेक्षा शक्तीशाली आणि श्रेष्ठ कुणीही नसेल. स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे.
३. प्रत्येक युवतीला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवणे आवश्यक
आपण समाजामध्ये बलात्कार घडू देतो म्हणून ते घडतात. जेव्हा आपण बलात्कार करणार्या प्रवृत्तीला आपल्या शक्तीने वैध मार्गाने धडा शिकवू, तेव्हाच बलात्कार पूर्णपणे बंद होतील. प्रत्येक आई-वडिलांनी, शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी सरकारकडे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवण्याची मागणी केली पाहिजे. हे जर निर्भयाच्या किंवा अन्य पीडित तरुणीच्या आई-वडिलांनी आधीच केले असते, तर आज ती आपल्यासह असती. अशा पीडित युवतींसाठी मेणबत्ती लावून किंवा मोर्चे काढून शांती मिळत नाही, तर ती मिळण्यासाठी लढायला हवे. तसेच आपल्या मुलालाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखे घडवायला हवे, जेणेकरून तो प्रत्येक स्त्रीचा सन्मान करील.
४. स्वतः लढायला शिकून इतरांनाही शिकवा !
माझी आजच्या समाजातील स्त्रीला कळकळीची विनंती आहे की, तिने स्वतःचे रक्षण स्वतः करावे. स्वतः लढायला शिकून इतरांनाही शिकवावे. कुणावरही अवलंबून न रहाता स्वतः स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वयंरक्षक बनावे; कारण ईश्वर तेव्हाच साथ देतो, जेव्हा आपण प्रयत्न करतो. प्रत्येक पुरुषानेही स्वतःच्या कुटुंबातील स्त्रियांना या लढाईत साथ दिलीच पाहिजे.
५. देशाला खरे स्वातंत्र्य मिळण्यासाठी सरकारने हे करावे…
सरकारला नम्र विनंती आहे की, जसे शिक्षण महत्त्वाचे आहे, तसे आपल्या मुलींचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जसे पोलीस आणि सैन्य यांत प्रवेश घेणार्या महिलांना प्रशिक्षण दिले जाते, तसेच देशातील प्रत्येक मुलीला स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. सरकारने ‘मी एक विरांगना’ ही मोहीम चालू करून त्यात देशातील प्रत्येक मुलीला लहानपणापासूनच स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे आणि या प्रशिक्षणासाठीच्या विविध योजना राबवल्या पाहिजेत. यामुळे आपल्या देशातील बलात्कार्यांची संख्या न्यून होऊन पुढे ती प्रवृत्ती नक्कीच नष्ट होईल आणि तेव्हाच खर्या अर्थाने देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. लक्षात घ्या, ‘‘मुलगी लढली की, ती यशस्वी होणारच.’’
– कु. कोमल रत्नाकर सोनार, जळगाव (६.३.२०२३)