प्रदूषण रोखण्यासाठी राबवण्यात आलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ या वर्षीही १०० टक्के यशस्वी !

हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने मागील २१ वर्षे राबवण्यात येते मोहीम !

खडकवासला अभियानात मानवी साखळी करत मोहिमेत सहभाग झालेले मान्यवर

पुणे, ७ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सलग २१ वर्षे धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येत आहे. रासायनिक रंग खेळून खडकवासला धरणात उतरणार्‍या नागरिकांचे मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून जलाशयाचे प्रदूषण रोखण्याचे हे अभियान या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाले. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ, प्रशासन आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान ७ मार्च या दिवशी राबवण्यात आले. या वेळी १५० हून अधिक उपस्थित कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून रंग खेळून येणार्‍यांना रोखले आणि त्यांचे प्रबोधनही केले. हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र ज्ञात व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रबोधन करत आहे. याचाच एक भाग म्हणून हे अभियान राबवण्यात आले.

नारळ वाढवून मोहिमेचे उद्घाटन करतांना खडकवासलाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर

या प्रसंगी खडकवासला मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार श्री. भीमराव (अण्णा) तापकीर यांनी भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून आणि नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन केले. या वेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अध्यक्ष श्री सचिन मोरे, खडकवासल्याचे माजी सरपंच विजय कोल्हे, भाजपचे दत्ता कोल्हे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले,  खडकवासला पाटबंधारे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विजय पाटील, क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक श्री. रूपेश मते, भाजप पुणे शहरचे माजी चिटणीस श्री. गिरीश खत्री, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. गोर्‍हे बुद्रुकचे उपसरपंच सुशांत उपाख्य बाबा खिरीड, शैलेश अभ्यंकर, पर्यावरण संरक्षण गतीविधी, संयोजक, सिंहगड विभाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री. मोहन बदाणे उपविभागीय अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग यांनीही अभियान स्थळी भेट दिली.

रंग खेळून आलेल्या युवकांचे प्रबोधन करतांना समितीचे कार्यकर्ते
मोहिमेत सहभागी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका आणि विद्यार्थी

हिंदु जनजागृती समितीच्या जलाशय रक्षणाच्या मोहिमेला पाठिंबा ! – श्री. भीमराव (अण्णा) तापकीर, आमदार, भाजप

या वेळी आमदार श्री. भीमराव तापकीर म्हणाले की, हिंदु जनजागृती समिती सलग २१ वर्षे २२ लाख लिटर पाणी स्वच्छ ठेवण्याचे कार्य करत आहे, याविषयी अभिनंदन ! आमचा या कार्याला पाठिंबा आहे. संपूर्ण दिवसभर जलाशयाचे रक्षण करणे, हे सामाजिक बांधिलकीचे काम ही संस्था करत आहे. पोलीस, प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांच्या कामाला हे सर्वजण सहकार्य करत आहेत.

पोलीस, प्रशासन आणि जनता यांचे अभियानाला सहकार्य !

अनेक कार्यकर्ते प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी ९ पासून सायंकाळी ७ पर्यंत जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करण्यात आली. रंगाने माखलेल्या युवक-युवतींचे प्रबोधन करून त्यांना धरणाच्या पाण्यात उतरण्यापासून प्रतिबंध करण्यात आला. पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचनात्मक फलक लावण्यात आले होते. या माध्यमातून प्रशासनाच्या वतीने रंग खेळून पाण्यात उतरण्यास प्रतिबंध असल्याविषयी जागृती करण्यात येत होती. अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे १२ मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे.

वैशिष्टपूर्ण

१. या वेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

२. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका सविता कुलकर्णी आणि त्यांचे विद्यार्थी यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

३. प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले.

४. ‘जलदेवतेचे अस्तित्व आणि कृपाशीर्वाद यांमुळेच हे अभियान यशस्वी झाले’, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

५. रंग खेळून येणार्‍या युवतीही प्रबोधन अभियानात सहभागी झाल्या.

६. अभियानस्थळी काही काळ वादळी वारा आणि पाऊस आला. तरीही सर्व कार्यकर्ते जलरक्षणासाठी ठामपणे उभे होते.