‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांच्या माध्यमातून चीन हेरगिरी करत असल्याने त्यांवर बंदी आणा !

अरुणाचल प्रदेशच्या आमदाराने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली मागणी !

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – चीनने केवळ सीमेवरच भारताला धोका दिला असे नाही, तर त्याने देशातील माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित पायाभूत सुविधांवरही आक्रमण केले आहे. चिनी बनावटीच्या ‘सीसीटीव्ही’ कॅमर्‍यांवर बंदी आणली पाहिजे. सरकारी कार्यालयांमध्ये चिनी सीसीटीव्ही वापरू नयेत, तसेच सामान्य जनतेनेही याचा वापर टाळण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि अरुणाचल प्रदेश राज्यातील पासीघाट पश्‍चिमचे काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. एका अनुमानानुसार भारतात जवळपास २० लाख सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून त्यांपैकी ९० टक्के म्हणजे तब्बल १८ लाख कॅमेरे चिनी बनावटीचे आहेत. विशेष म्हणजे भारताच्या सरकारी कार्यालयांमध्येही अशा प्रकारचे कॅमेरे लागले आहेत.

आमदार एरिंग पुढे म्हणाले की,

१. या कॅमेर्‍यांचा वापर चीन हेरगिरीसाठी करू शकतो. हे कॅमेरे चीनचे डोळे आणि कान यांप्रमाणे उपयोगात आणले जाऊ शकतात.

२. सध्याचा कायदा अशा प्रकारच्या आव्हानाचा सामना करण्यास असमर्थ आहे. अशा परिस्थितीत भारताकडून मोठे पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे.

३. अमेरिकेच्या एका गुप्तचर आस्थापनाने म्हटले आहे की, चिनी ‘हॅकर’ जगासाठी धोका बनले आहेत. हॅकर्सनी सध्या उत्तर भारतावर लक्ष केंद्रीत केले आहे.