नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याने त्यांना उद्देशून देशद्रोही म्हटले ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

विरोधकांना देशद्रोही संबोधल्याच्या कारणावरून मुख्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव !

खासदार संजय राऊत यांना ७ दिवसांत खुलासा करण्याचे उपसभापतींचे आदेश

डावीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री नवाब मलिक

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची सिद्धता केल्यानंतर विरोधकही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह्यांसमवेत चहापान टाळले ते बरे झाले, असे वक्तव्य केले होते. हा धागा पकडून २ मार्च या दिवशी विधान परिषदेत विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव प्रविष्ट करण्यात आला.

यावर खुलासा करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे आतंरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संंबंध असल्याने त्यांना उद्देशून ‘देशद्रोही’ म्हटले होते. मी विरोधी पक्षनेते अजित पवार अथवा अंबादास दानवे यांना देशद्रोही म्हटलेले नाही’, असे स्पष्ट केले. दुसरीकडे ‘खासदार संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा ७ दिवसांत खुलासा करावा’, अशी सूचना उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.