गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला !
मालवण (सिंधुदुर्ग) – ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर २७ फेब्रुवारी या दिवशी दुमदुमून गेला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वायंगणी येथे ४ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारासाठी वाहनफेरी काढण्यात आली. या वेळी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. दुचाकींवर भगवे ध्वज लावून येथील परिसरातून निघालेल्या वाहनफेरीमुळे वातावरणही भगवेमय आणि चैतन्यदायी झाले होते. या वेळी ‘ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेस सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहा !’, असे आवाहन करण्यात आले.
या फेरीला श्री देव रामेश्वर मंदिरापासून प्रारंभ झाला. प्रारंभी आचरा येथील धर्माभिमानी श्री. अशोक पवार यांनी सपत्नीक धर्मध्वजाचे पूजन केले. श्री. मंदार सांबारी यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला, तसेच येथील वहीवाटदार श्री. विनीत मिराशी यांनी श्रीफळ वाढवले. पूजनाचे पौरोहित्य श्री. मंदार सरजोशी यांनी केले. त्यानंतर शंखनादाने फेरीला प्रारंभ झाला.
फेरीच्या प्रारंभी श्री देव रामेश्वर मंदिरात सद्गुरु सत्यवान कदम यांच्या वंदनीय उपस्थितीत गार्हाणे घालण्यात आले, तसेच फेरीच्या मार्गात वायंगणी येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात स्वामींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेण्यात आले आचरा तिठा, बाजारपेठ, हिर्लेवाडी, वायंगणी श्री स्वामी समर्थ मठ, आचरा हायस्कूल मार्गे पुन्हा आचरा तिठा येथे या फेरीची सांगता झाली. सांगतेच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी सभेचा उद्देश सांगून ही सभा यशस्वी करण्याचे आवाहन हिंदूंना केले.