गोव्यात शिगमोत्सवाला ८ मार्चपासून फोंड्यातून प्रारंभ होणार !

पणजी, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्यात यंदा शिगमोत्सवाला ८ मार्चपासून परंपरेप्रमाणे फोंड्यातून प्रारंभ होणार असून एकूण १८ ठिकाणी शासकीय शिगमोत्सव साजरा होणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी २७ फेब्रुवारीला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आमदार सुभाष फळदेसाई, आल्टन डिकोस्ता, आमदार जोशुआ डिसोझा, डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रवीण आर्लेकर आणि पर्यटन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार पर्यटन खात्याने शिगमोत्सव समित्यांसमवेत संयुक्त बैठक घेतली. सर्वांशी चर्चा करून दिनांक ठरवण्यात आले आहेत. ८ मार्चला फोंड्याहून शिगमोत्सवाला प्रारंभ होईल. ९ मार्चला कळंगुट, १० मार्चला सांखळी आणि डिचोली; ११ मार्चला पणजी, १२ मार्चला पर्वरी, १३ मार्चला म्हापसा, १४ मार्चला वाळपई आणि पेडणे अशा प्रकारे उत्तर गोव्यात उत्सव झाल्यानंतर दक्षिण गोव्यात १५ मार्चला सांगे, १६ मार्चला कुडचडे आणि केपे; १७ मार्चला वास्को, १८ मार्चला मडगाव, १९ मार्चला शिरोडा आणि धारबांदोडा; २० मार्चला कुंकळ्ळी आणि २१ मार्चला काणकोण येथे उत्सवाची समाप्ती होईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली वेळेच्या मर्यादेचे पालन करण्याचा प्रयत्न करून शिगमोत्सव साजरा केला जाणार आहे. पर्यटन खात्याच्या संचालकांनी या वेळी सांगितले की, ज्या ठिकाणी हा शिगमोत्सव होणार आहे, तेथील स्थानिक शिगमोत्सव समिती तेथील आयोजनासंदर्भात सर्व सिद्धता, तसेच आवश्यक अनुमत्या काढण्यासाठी उत्तरदायी असेल.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘पणजीला सध्या अनेक अडचणी आहेत; पण येथील समितीने आम्हाला आश्वस्त केले आहे की, ते या गोष्टींचे दायित्व घेतील. त्यांना आमच्याकडून जे काही सहकार्य हवे असेल ते देऊ. शिगमोत्सव रात्री १० वाजेपर्यंत पूर्ण व्हावा, असे सांगितले आहे, तरीही ‘त्या दिवसापुरती सवलत द्यावी’, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत.
फोंडा येथे अंत्रुज शिगमोत्सव समितीच्या बैठकीत आमदार रवि नाईक यांनी वेळेचे पालन करण्याचे आवाहन सर्व पथकांना केले आहे.

फोंडा अंत्रुज शिगमोत्सव समितीच्या वतीने फेटेबांधणी कार्यशाळेचे आयोजन

फेटेबांधणी

शिगमोत्सवात फेटेबांधणी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी अंत्रुज शिगमोत्सव समितीच्या वतीने २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तिस्क, फोंडा  येथील शिगमोत्सव कार्यालयात ४ आणि ५ मार्च असे २ दिवस सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रसिद्ध फेटेबांधणी प्रशिक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होणार आहे. पहिल्या २५ प्रशिक्षणार्थींनाच या कार्यशाळेचा लाभ घेता येईल.