दुसर्‍या दिवशीचे विधीमंडळाचे कामकाज विलंबाने मिळत असल्‍याची विरोधी पक्षनेत्‍यांची तक्रार !

विरोधी पक्षनेते अजित पवार 

मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – अधिवेशनाच्‍या दुसर्‍या दिवसाचे कामकाज रात्री १२ वाजता मिळते. एवढ्या विलंबाने विषय कळल्‍यानंतर त्‍याची माहिती घेण्‍यासाठी एवढ्या रात्री कुणाला उठवायचे ? कामकाज रात्री १० वाजेपर्यंत मिळाल्‍यास त्‍यावरील उत्तरे घेता येतील, अशा शब्‍दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहितीच्‍या सूत्राखाली २७ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत विधीमंडळ सचिवालयाच्‍या कामकाजाविषयी असंतोष व्‍यक्‍त केला.

सदस्‍यांनी दिलेले तारांकित प्रश्‍न स्‍वीकृत केले कि अस्‍वीकृत, याविषयीची माहिती दिली जात नाही. यापूर्वी सदस्‍यांना माहिती कळवण्‍यात येत होती; मात्र मागील काही वर्षांत याविषयीची माहिती दिली जात नाही. विधीमंडळाच्‍या प्रथा-परंपरा यांना डावलले जात असल्‍याची तक्रार अजित पवार यांनी या वेळी केली. यावर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोरोनामुळे अधिवेशने न झाल्‍यामुळे काही कामांमध्‍ये खंड पडला आहे. ती पूर्ववत करण्‍यात येतील’, असे म्‍हटले. विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज योग्‍य पद्धतीने व्‍हावे, यासाठी संसदीय कार्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्‍यात येईल, असे सांगितले.