विरोधी पक्षाच्‍या आमदारांमध्‍ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्‍यमंत्र्यांनी खुलासा करावा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

  • मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या ‘देशद्रोही’ वक्‍तव्‍यावर विधान परिषदेत गदारोळ !

  • गदारोळातच कामकाज चालू !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (उजवीकडे )

मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – विरोधी आमदारांमध्‍ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्‍यमंत्र्यांनी खुलासा करावा. मुख्‍यमंत्र्यांनी ज्‍या प्रकारची विधाने केली, त्‍यातून हे राज्‍य सरकार खरोखरच ‘महाराष्‍ट्रविरोधी’ वाटू लागले आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्‍हटले. ‘मुख्‍यमंत्र्यांना त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यावर स्‍पष्‍टीकरण देण्‍याचे निर्देश द्यावे’, अशी विनंती त्‍यांनी उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्‍याकडे केली.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ फेब्रुवारी या दिवशी चहापानावर बहिष्‍कार टाकणार्‍या महाविकास आघाडीतील आमदारांना ‘देशद्रोही’ संबोधले होते. अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाच्‍या पहिल्‍या दिवशी विधान परिषदेत विरोधी पक्षाच्‍या आमदारांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध केला.

संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील म्‍हणाले की, जेव्‍हा मुख्‍यमंत्री सभागृहात उपस्‍थित रहातील, तेव्‍हा त्‍यांच्‍या विधानावर आक्षेप घेतल्‍यास ते त्‍याला उत्तर देतील;  मात्र त्‍याआधी राज्‍य सरकार कसे महाराष्‍ट्रविरोधी आहे, हेही विरोधकांनी सिद्ध करावे. चंद्रकांत पाटील यांच्‍या वक्‍तव्‍यावर अप्रसन्‍न झालेल्‍या ठाकरे गटाच्‍या आमदारांनी विधान परिषदेत उपसभापतींच्‍या समोरील मोकळ्‍या जागेत येऊन घोषणा देणे चालू केले.