खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – उन्मेष पाटील, खासदार, भाजप

सुराज्य अभियानाकडून उन्मेष पाटील यांना निवेदन सादर

खासदार उन्मेष पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना प्रशांत जुवेकर

जळगाव – ‘खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी तिकीट आकारणीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीन’, असे आश्वासन जळगावमधील भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिले. सुराज्य अभियानाच्या वतीने श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. शेखर चौधरी यांनी खासदार पाटील यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी वरील आश्वासन दिले.

खासदार पाटील पुढे म्हणाले, ‘‘खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीटदरावर नियंत्रण ठेवणारी कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नाही. परिणामी गरीब आणि गरजू प्रवाशांची लूटमार होत आहे. हे रोखण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी, तसेच केंद्रातील संबंधितांशी चर्चा करून खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीटदरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीन. असे झाल्यास प्रामाणिक व्यवसाय करणार्‍यांनाही संधी मिळेल.’’

रेल्वेस्थानकांवरील पिण्याच्या पाण्याची (वॉटर वेंडिग मशीन) सुविधा पूर्ववत् चालू करण्याची रेल्वे अधिकार्‍यांना सूचना देणार !

या वेळी श्री. प्रशांत जुवेकर यांनी खासदार पाटील यांचे रेल्वे स्थानकांवरील अत्यल्पदरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी लोकप्रिय सुविधा बंद असल्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. आता उन्हाळा चालू झाला असल्याने प्रवाशांचे हाल होतात आणि त्यांना नाईलाजाने २० ते ३० रुपयांना पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते. हे टाळण्यासाठी ‘वॉटर वेंडिग मशीन’ची ही सुविधा तात्काळ चालू करावी, अशी मागणी श्री. जुवेकर यांनी केली. यावर खासदार पाटील यांनी ‘रेल्वे अधिकार्‍यांशी बोलून तात्काळ ही सुविधा चालू करण्याची सूचना देईन’, असे आश्वासन दिले.