घरकुलासाठी ७ लाख रुपये भरण्याचे सातारा पालिका प्रशासनाचे आदेश !

नागरिकांकडून निषेध मोर्चा काढत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

सातारा, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील मतकर कॉलनीमध्ये झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे प्राप्त व्हावीत; म्हणून ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या अंतर्गत सातारा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ७ लाख रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच्या निषेधार्थ मतकर कॉलनी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या अंतर्गत सातारा नगरपालिकेच्या वतीन वर्ष २०१६ मध्ये मतकर कॉलनी येथील झोपडपट्टीची पहाणी करण्यात आली होती. या वेळी तेथील नागरिकांकडे काय आहे किंवा नाही ? याची पहाणी करून नोंदी करण्यात आल्या होत्या. पुढे केवळ ३० सहस्र रुपये भरून हक्काचे घर मिळेल, असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले; मात्र पुढे ४ वर्षे यावर कोणतीही प्रक्रिया झाली नाही. पुढे अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर वर्ष २०२१ मध्ये प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. त्या वेळी पालिका प्रशासनाकडून प्रत्येक घरकुलासाठी ७ लाख रुपये किंमत सांगण्यात आली. हातावरचे पोट असणारे गरीब झोपडपट्टीवासीय ७ लाख रुपये कुठून आणणार ? तसेच घरकुलासाठी ७ लाख रुपये कर्ज दिले, तरी लोकांच्या घरी धुणी-भांडी करणारी कुटुंबे कर्जाचा हप्ता तरी कुठून देणार ? हा प्रश्न आम्हाला पडला आहे. प्रशासनाने निर्धारीत केलेली रक्कम आम्हास अमान्य आहे, तसेच प्रशासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.