खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याच्या साथीदाराची पोलिसांकडून सुटका !

खलिस्तान्यांसमोर शरणागती पत्करलेले आम आदमी पक्षाच्या सरकारचे पंजाब पोलीस !

अमृतसर (पंजाब) – येथील अजानल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याचा साथीदार लवप्रीत तूफान सिंह यांची सुटका केली. २३ फेब्रुवारी या दिवशी त्याच्या सुटकेसाठी सहस्रो सशस्र खलिस्तानवादी शिखांनी या पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. त्यांनी दबाव आणल्यामुळेच लवप्रती तुफान सिंह याची सुटका करण्यात आली. तो कारागृहातून बाहेर आल्यावर खलिस्तान्यांनी त्याचे हार घालून स्वागत केले. सुटकेविषयी पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, लवप्रती तुफान सिंह याने तो गुन्ह्याच्या वेळी उपस्थित नसल्याचे पुरावे सादर केल्याने त्याला सोडण्यात आले. (यावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवील का ? – संपादक) आम्ही हे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.

१. अमृतपाल सिंह याचा दुसरा साथीदार पप्पल प्रीत सिंह याने सांगितले की, अमृतपाल वैयक्तिक लढाई लढत नाही, तो शीख समाजासाठीची लढाई लढत आहे. तुफानच्या सुटकेनंतर आम्ही सर्व सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत.

२. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांवर मारहाणीच्या संदर्भातील गुन्ह्याच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तान्यांनी पोलीस ठाण्याला सहस्रोंच्या संख्येने सशस्त्र होऊन वेढा घातल्यावर पोलीस अशी माघार घेणार असतील, तर खलिस्तानवाद्यांचे मनोबल वाढून राज्यात त्यांची दहशत निर्माण होण्यास खतपाणी मिळणार आहे. हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी हस्तपेक्ष करणे आवश्यक !