आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याच्या धमक्या !

  • पाकिस्तान, इंडोनेशिया आणि इंग्लंड येथून धमकीचे भ्रमणभाष !

  • केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे संरक्षण देण्याची राजासिंह यांची मागणी

आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर – येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ, तसेच गोशामहल विधानसभा मतदारसंघातील आमदार टी. राजासिंह यांना विदेशांतून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पाकिस्तान, इंडोनेशिया आणि इंग्लंड येथून धमकीचे दूरध्वनी त्यांना आले आहेत. राजासिंह म्हणाले, ‘‘२४ फेबु्रवारी या दिवशीही मला धमकी मिळाली. त्यात धमकी देणार्‍या व्यक्तीने ‘मी तुझ्यासाठी मृत्यू आहे. मी तोच आहे, जो तुला मारून टाकणार आहे. सावधान रहा; कारण मी तुमच्यामध्येच आहे. मी तुला त्याच पद्धतीने मारून टाकीन, ज्याप्रमाणे मी तुमच्या देवाला मारून टाकले. मुसलमान कधी मरणार नाहीत. तुझे हृदय माझ्यासाठी खाण्याची मेजवानी असेल’, अशा शब्दांत धमकी दिली आहे. इतकेच नव्हे, तर धमकी देणार्‍याने ‘औवैसी यांच्या मतदारसंघात कारवाया करणारे अनेक छुपे गट कार्यरत आहेत. बस काही दिवसांतच तुझे काम तमाम होणार आहे’, असे शब्द वापरले आहेत.’’

यावर राजासिंह यांनी धमकी देणार्‍या व्यक्तीचे आव्हान स्वीकारून तिला समोर येण्याचे आव्हान दिले. त्यावर ती व्यक्ती उत्तर देण्याचे टाळून राजासिंह यांना धमकी देत राहिली. यासह त्या व्यक्तीने स्वतःचे नाव आणि पत्ताही सांगण्यास नकार दिला. तिने हिंदु धर्माची खिल्लीही उडवली, अशीही माहिती राजासिंह यांनी दिली.
राजासिंह यांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे संरक्षण प्रदान करण्याची मागणी केली आहे. यासह त्यांनी तेलंगाणा सरकार त्यांच्या हत्येच्या षड्यंत्रात सहभागी असल्याचा आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदुबहुल राष्ट्रात एका हिंदुत्वनिष्ठाला अशा प्रकारे धमक्या मिळणे, हे समस्त हिंदू आणि सरकारी यंत्रणा यांना लज्जास्पद ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !