उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे !

मी बोललो, तर अनेकांची अडचण होईल ! – मुख्यमंत्री

संभाजीनगर – मी दिलेल्या गोष्टी कधीही काढत नाही. मी त्यावर बोलणार नाही. मला बोलायला लावू नका. मी बोललो, तर अनेकांची अडचण होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिलेला होता. याविषयी सर्वत्र चर्चा चालू आहे. २३ फेब्रुवारी या दिवशी शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या शाही उपाहारगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी वरील भाष्य केले. या वेळी मंत्री संदीपान भुमरे, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि रमेश बोरनारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,

१. आम्हाला संपत्तीचा मोह नाही, वा कधीही नव्हता. आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे.
२. आम्ही धडाकेबाज निर्णय घेत असल्यामुळे विरोधक बिथरले आहेत. त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ.
३. ‘एम्.पी.एस्.सी.’च्या प्रश्नावर आम्ही तोडगा काढत आहोत. या प्रश्नावर राजकारण चालू आहे; मात्र आम्हाला राजकारण करायचे नाही. आम्ही प्रश्न सोडवणारे आहोत.
४. खरी शिवसेना आमच्याकडेच आहे. खासदार संजय राऊत यांना दिलेल्या धमकीचे प्रकरण हे केवळ कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी केलेले कारस्थान आहे. याची सखोल चौकशी गृह विभागाद्वारे होईल.