हिंदु समाजाचा संघटित हुंकार : हिंदु जनआक्रोश मोर्चा !

हिंदु जनआक्रोश मोर्च्‍यामध्‍ये हिंदूंनी वर्ण, जाती आणि संप्रदाय विसरून एकत्र येणे ही हिंदु राष्‍ट्राची नांदी !

हिंदु जनआक्रोश मोर्च्याचे प्रातिनिधिक छायाचित्र

गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्‍या अन्‍यायाच्‍या विरोधात लोकशाहीच्‍या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्‍तबद्ध आवाज म्‍हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय. सर्वस्‍पर्शी आणि सर्वव्‍यापी संपर्क झाल्‍यामुळे सर्वसामान्‍य हिंदु समाज म्‍हणून या मोर्चात रस्‍त्‍यावर उतरत आहे. महाराष्‍ट्रातील जवळपास सर्व शहरांमध्‍ये आणि जिल्‍ह्यांमध्‍ये उत्‍स्‍फूर्तपणे अशा स्‍वरूपाचे मोर्चे निघण्‍यास आरंभ झाला आहे. २२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘भयंकर घटनांमुळे संतप्‍त झालेल्‍या हिंदूंनी मोर्चे काढण्‍यास केलेला आरंभ, समाजातील सुप्‍त संतापाचे विराट जनआक्रोशामध्‍ये झालेले रूपांतर,  हिंदु जनआक्रोश मोर्च्‍यातील प्रमुख मागण्‍या आणि सत्तेत हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकार असतांना मोर्च्‍यांची आवश्‍यकता का ?’, आदी सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. 

लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा : https://sanatanprabhat.org/marathi/656146.html

६. मोर्चाला मिळालेला प्रतिसाद आणि त्‍यानंतर झालेला सकारात्‍मक परिणाम !

शहर आणि जिल्‍हा यांच्‍या ठिकाणी ७५ सहस्र ते १ लाख हिंदूंचे, तर तालुक्‍याच्‍या ठिकाणी २५ ते ३० सहस्र हिंदूंचे मोर्चे निघाले. यावरून असे लक्षात येते की, या जनआक्रोश मोर्चांना उदंड आणि उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सातारा येथे मोर्चा झाल्‍यानंतर जिल्‍ह्यातील ११ तालुक्‍यांचे स्‍वतंत्र ११ मोर्चे निघाले आणि आता कदाचित् भविष्‍यात पुढे शहरांचे अन् जिल्‍ह्यांचे मोर्चे झाल्‍यानंतर प्रत्‍येक तालुक्‍याचे अन् शहरातील वेगवेगळ्‍या उपनगरांचे स्‍वतंत्र मोर्चे निघतील.

या मोर्च्‍यांमुळे पुढीलप्रमाणे सकारात्‍मक परिणाम झाले –

अ. मोर्चानंतर सामाजिक स्‍तरावर या सर्व समस्‍यांविषयी जागरूकता निर्माण झाली.

आ. हिंदु समाजाचे मनोबल आणि आत्‍मविश्‍वास शतपटींनी वाढला.

इ. पोलीस आणि प्रशासन यांच्‍या स्‍तरावर या विषयांची आता योग्‍य रितीने नोंद घेतली जाऊ लागली आहे.

ई. ‘लव्‍ह जिहाद’ हा रा.स्‍व. संघाचा प्रपोगंडा आहे’, असे प्रसारमाध्‍यमे आणि बुद्धीजिवी म्‍हणत होते. ते आता नाईलाजाने का होईना; पण ‘लव्‍ह जिहाद ही समस्‍या आहे’, असे मानायला लागले आहेत.

उ. मोर्च्‍यातून दिसणार्‍या हिंदु ‘व्‍होट बँक’ेच्‍या (मतपेढीच्‍या) प्रभावामुळे कुठल्‍याही राजकीय पक्षाने किंवा नेत्‍याने आतार्यंत या मोर्चाच्‍या विरोधात एक अवाक्षरही काढलेले नाही.

७. सगळे नेते केवळ राजकारणी नाहीत, तर काही हिंदुत्‍वनिष्‍ठही असतात, हे मोर्चातून लक्षात येणे

राजकीय पक्ष, नेतेमंडळी यांचा या हिंदु जनआक्रोश मोर्चांशी कुठलाही संबंध नव्‍हता, तरी राज्‍य पातळीवर काही राजकीय नेतेमंडळी उघड उघड हिंदुत्‍वाच्‍या रक्षणासाठी या मोर्चामध्‍ये उतरली आणि या समस्‍यांविरुद्ध विधानसभेमध्‍ये अन् विधानसभेच्‍या बाहेरदेखील आवाज उठवला. यामध्‍ये प्रामुख्‍याने भाजपचे आमदार नितेश राणे, चित्रा वाघ, आमदार दिलीप कांबळे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश लांडगे, आमदार राम सातपुते, शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले आदींचा समावेश होता.

गेले दशकभर अनेक तळागाळातील हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांनी जे जागृतीचे काम केले, त्‍याला हिंदु समाजाने हिंदु जनआक्रोश मोर्चाच्‍या माध्‍यमातून एक प्रकारे मान्‍यता दिलेली आहे. हे लेखन मी अशा सर्व कार्यकर्त्‍यांना समर्पित करतो, ज्‍यांनी स्‍वत:च्‍या जिवावर उदार होऊन आणि सातत्‍य टिकवून ‘लव्‍ह जिहाद’सारख्‍या भीषण समस्‍येविरुद्ध जागृती केली अन् लव्‍ह जिहादमध्‍ये अडकलेल्‍या सहस्रो हिंदु मुलींना सोडवले.

८. मोर्च्‍यांची वैशिष्‍ट्ये

८ अ. ओघवते वक्‍तृत्‍व किंवा कसलेले नेतृत्‍व नसतांनाही मोर्च्‍यांना लाभलेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद ! : साधारण मोर्चा म्‍हटले की, एखादा वक्‍ता असतो, ज्‍याच्‍याकडे ओघवती आणि प्रभावी अशी वक्‍तृत्‍वशैली असते किंवा एखादा कसलेला नेता असतो, ज्‍याच्‍या पाठीमागे सहस्रो लोकांचे पाठबळ असते. लोक केवळ अशा नेत्‍याची पाठराखण करण्‍यासाठी किंवा आपल्‍या आवडत्‍या नेत्‍याचे वक्‍तृत्‍व ऐकण्‍यासाठी गर्दी करत असतात. हिंदु जनआक्रोश मोर्चात मात्र कुठेही असा एखादा कसलेला नेता दिसत नाही. या मोर्चाला संबोधित करणारे वक्‍ते जर आपण बघितले, तर ते हिंदुत्‍वाच्‍या चळवळीतूनच आलेले  नवीन वक्‍ते आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र फारसा ओळखत नाही. यावरून हे लक्षात येते की, मोर्च्‍यामध्‍ये होणारी गर्दी किंवा लोक हे उत्‍स्‍फूर्तपणे उपस्‍थित राहिले आहेत.

८ आ.  एकच संघटना किंवा पक्ष यांचा नव्‍हे, तर सर्व संघटनांचा सहभाग ! : मोर्च्‍याचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे कुठल्‍याही संघटनेने किंवा कुठल्‍याही पक्षाने या मोर्चाची हाक दिलेली नाही किंवा मोर्चाच्‍या आयोजनामध्‍ये कुठल्‍याही प्रमुख अशा एकाच संघटनेचा सहभाग नाही, तर सर्व संघटना आपला अभिनिवेश विसरून या मोर्चात सहभागी झाल्‍या होत्‍या. धर्म जागरण, हिंदु जागरण, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्‍ठान, सनातन संस्‍था, हिंदु एकता आंदोलन, सह्याद्री प्रतिष्‍ठान, हिंदु जनजागृती समिती या प्रमुख हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह सामाजिक संस्‍था, सार्वजनिक गणेशोत्‍सव आणि नवरात्रोत्‍सव मंडळे, वारकरी संप्रदाय, छोटी छोटी प्रतिष्‍ठाने, दुर्गा वाहिनी अन् मातृशक्‍ती, भजनी आणि आरती मंडळे, सर्व मठ-मंदिरे अन् धार्मिक संस्‍था यांच्‍या जोडीला योगवर्ग, बचतगट, आर्ट ऑफ लिव्‍हिंग, पतंजलि परिवार, श्रीराम संघटना, मातंग चेतना परिषद, गुरुद्वारा शीख समाज यांच्‍या माध्‍यमातून सर्वस्‍पर्शी आणि सर्वव्‍यापी संपर्क झाल्‍यामुळे सर्वसामान्‍य हिंदु कुटुंबेही या मोर्चात रस्‍त्‍यावर उतरत आहेत.

८ इ.  मोर्चासाठी ना विज्ञापन, ना फलकबाजी ! : या मोर्च्‍यांच्‍या प्रसिद्धीसाठी जसे आपल्‍याला नेहमी दिसतात, तसे कुठल्‍याही मोठ्या राजकीय किंवा सामाजिक नेत्‍याचे फोटो आणि नावे असलेले फ्‍लेक्‍स (फलक) दिसले नाहीत, जे काही फलक दिसत होते, ते फक्‍त ‘सकल हिंदू समाज’ याच नावाने दिसत होते.

८ ई. मोर्चात ना जाती ना पंथ, असते ते केवळ हिंदुत्‍व ! : ‘वर्ण-जाती विसरून जाऊ, हिंदू सारे एक होऊ’ अशा पद्धतीचे एक प्रकारे भारलेले वातावरण या मोर्चांमध्‍ये असते. जाती आणि पंथच काय, कुठल्‍याही संघटनेचा किंचित्‌ही अभिनिवेश अन् श्रेयवाद या मोर्चांमध्‍ये जाणवत नाही. सर्व हिंदु बांधव ‘सकल हिंदू समाज’ म्‍हणून एकत्र आलेले असतात. ‘कंधों से उपर छाती नही होती, धर्म से उपर जाती नही होती’, अशा प्रकारच्‍या घोषणांनी आसमंत दुमदुमून जातो. टाळ-मृदुंग, हातामध्‍ये कार्डशीटवरील स्‍लोगन्‍स (प्रबोधनपर फलक) अन् भगवे झेंडे धरून सहकुटुंब आलेले सामान्‍य हिंदु बांधव, ज्‍यामध्‍ये महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग असतो. या सर्वांच्‍या हृदयात एकच भाव जाणवत होता, तो म्‍हणजे ‘एक दिवस धर्मासाठी, एक दिवस हिंदुत्‍वासाठी !’

९. मोर्च्‍याचे फलित

अनुमाने २२ मोर्चांमध्‍ये सहभागी होणारे हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते श्री. विक्रमजी पावसकर यांच्‍या मते ‘या मोर्चांचे फलित म्‍हणजे प्रत्‍येक मोर्चानंतर २५ सहस्र मुली ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये अडकण्‍यापासून नैसर्गिकरित्‍या वाचल्‍या’, असे समजावे.

– श्री. नीलेश भिसे