पाकने चीनकडून घेतलेली शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे ठरत आहेत कुचकामी !

नवी देहली – पाकिस्ताने चीनकडून मानवरहित वापरण्यात येणारी शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे खरेदी केली होती. त्यांतील अनेक उपकरणांचे तुकडे झाले असून अनेक महागडी महत्त्वाची उपकरणे सदोष असल्याचे दिसून आले आहे. ‘चीनकडून मोठी किंमत देऊन खरेदी केलेली शस्त्रे कुचकामी ठरल्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे’, असे पाकच्या सैन्याने म्हटले आहे. आता पाकिस्तानी सैन्याने सर्व शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे दुरुस्त करण्याची किंवा पालटून देण्याची मागणी केली आहे. ‘चीनने आमची मागणी मान्य न केल्यास आम्हाला यापुढे पाश्‍चात्त्य देशांमधून शस्त्रांची खरेदी करावी लागेल’, असेही पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.

१. पाकला देण्यात आलेल्या या शस्त्रांचे देखभाल करण्याचे दायित्व चीनच्याच ‘एलीट’ नावाच्या आस्थापनाकडे आहे. या आस्थापनाने या शस्त्रांची तपासणी केली असता  बहुतांश शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे यांमधील उपकरणे तुटलेल्या अवस्थेत होती.

२. एका मानवरहित हवाई वाहनामधील टर्बोचार्जरला (या उपकरणाद्वारे इंजिनची क्षमता वाढवली जाते.) तडे गेले होते. शत्रूदेशांचे सैन्य आणि शस्त्रभंडार कुठे आहे, हे पहाण्यासाठी मानवरहित हवाई वाहनांचा वापर केला जातो.

३. ‘एआर-२’ या भूमीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांची तपासणी केली असता, यांतील काही क्षेपणास्त्रे कुचकामी नसल्याचे दिसून आले. ते मारा करण्याच्याही स्थितीत नव्हते.

संपादकीय भूमिका 

चीनचा हाच इतिहास राहिला आहे. त्यामुळे पाकला देण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये तरी काय वेगळे असणार ? पाकिस्तानकडे चीनला जाब विचारण्याचे तरी धाडस आहे का ?