‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटी रुपयांचा व्यवहार !

संजय राऊत यांचा ट्वीटद्वारे गंभीर आरोप

संजय राऊत

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का देत ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाला दिले. या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. हा प्राथमिक आकडा असून १०० टक्के सत्य असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्र दिले असून तेथे त्यांच्या ओळी आहेत. त्यात म्हटले आहे, ‘‘न्यायव्यवस्था काही जणांची वारांगना झाली असून संसदही तृतीयपंथियांची हवेली झाली आहे. अशा वेळी मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे ! कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..! – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.’ केंद्रीय निवडणूक आयोगावर आरोप करत ‘पुढे अनेक गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते’, असेही राऊत यांनी नमूद केले आहे.

शिवसेना भवन आणि सर्व शाखा आमच्याकडेच रहाणार ! – संजय राऊत

‘शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा आमच्याकडेच रहातील. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला संपवण्यासाठी वापरलेले तंत्र आहे’, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.