अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहद यांचा विवाह अनधिकृत – मौलाना शहाबुद्दीन

विवाहापूर्वी मुलीचे इस्लाममध्ये धर्मांतर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन

डावीकडून मौलाना शहाबुद्दीन आणि अभिनेत्री स्वरा भास्कर

लक्ष्मणपुरी – अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहद यांचा विवाह अनधिकृत आहे, असे प्रतिपादन बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन यांनी केले. ते पुढे म्हणाले की, ‘शरीयत-ए-एलामिया’नुसार इस्लाम न स्वीकारणार्‍या मुसलमानेतर मुलीचा मुसलमान मुलाशी विवाह अधिकृत मानला जात नाही. त्यासाठी मुलीला इस्लाम स्वीकारावाच लागेल.

अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयात नवदांपत्याच्या स्वागत समारंभाची जोरदार सिद्धता

शैक्षणिक संकुलात अशा वैयक्तिक कार्यक्रमांना अनुमती मिळते कशी ?

स्वरा भास्कर आणि फहद यांच्या विवाहानिमित्त अलीगड मुस्लिम  विश्वविद्यालयात स्वागत समारंभाची (रिसेप्शन) जोरदार सिद्धता चालू आहे. यासाठी या विश्वविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा माजी उपाध्यक्ष फैजुल हसन याने पुढाकार घेतला आहे. फहद हाही याच विश्वविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे.

तथापि या विश्वविद्यालयाचा अन्य एक माजी उपाध्यक्ष नदीम अंसारी याने या स्वागत समारंभाच्या आयोजनाला विरोध दर्शवला आहे. तो म्हणाला, ‘‘अलीगड मुस्लिम विश्वविद्यालय हे एक शैक्षणिक संकुल असून तेथे असे कार्यक्रम आयोजित करणे अशोभनीय आहे. मी यास विरोध करीन.’’