अफगाणिस्तानवर आक्रमण करणार नाही ! – पाकिस्तान

अफगाणिस्तानमध्ये स्थिर सैन्य आणि आतंकवादविरोधी पथक स्थापन करण्याची आवश्यकता असल्याची व्यक्त केली इच्छा !

म्युनिच (जर्मनी) – अफगाणिस्तानवर पाकिस्तान कधीही आक्रमण करू इच्छित नाही. मागील घोडचुका आम्ही पुन्हा करू इच्छित नाही. त्यामुळे हेच योग्य होईल की, अफगाणिस्तानमध्ये कायदे लागू करणार्‍या संस्थांनी योग्य काम करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी येथे व्यक्त केली. ते येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत बोलत होते.

बिलावर झरदारी म्हणाले की, जगाने अफगाणिस्तानमधील अंतरिम सरकारला स्थिर सैन्य बनवण्यासाठी साहाय्य करण्यासाठी पर्याय शोधावेत; कारण अफगाणिस्तानकडे स्वतःचे सैन्य नाही आणि आतंकवादविरोधी पथक किंवा सीमेचे संरक्षण करणारी योग्य व्यवस्था नाही. त्यांच्याकडे या संदर्भात इच्छाशक्ती असली, तरी आतंकवादाच्या संकटावर मात करण्याची क्षमता नाही. ही एक समस्या आहे. हा त्याच्या शेजारी देशांना आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोका आहे. जर याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही, तर हा आतंकवाद पाकच्या बाहेर पसरू शकतो. युक्रेनचे युद्ध चालू झाल्यापासून जगाने अफगाणिस्तानकडे लक्ष दिलेले नाही.