भविष्य अंधःकारमय झाल्याने चरितार्थासाठी विदेशात जात आहेत पाकिस्तानी नागरिक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – दिवाळखोरीकडे पोचलेल्या पाकमध्ये आता सहस्रोच्या संख्येने नागरिक अन्य देशांमध्ये चरितार्थासाठी जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.


१. पाकिस्तान सरकारच्या ‘ब्यूरो ऑफ इमिग्रेशन अँड ओवरसीज एम्प्लॉयमेंट’च्या आकडेवारीनुसार वर्ष २०२२ मध्ये ८ लाख ३२ सहस्र ३३९ पाकिस्तानी विदेशात गेले. वर्ष २०१६ नंतर इतक्या मोठ्या संख्येने पाकिस्तानी विदेशात गेले नव्हते. वर्ष २०२२ मध्ये सर्वाधिक म्हणजे ५ लाख १४ सहस्र नागरिक सौदी अरेबियामध्ये गेले.

२. क्वेटा येथील पारपत्र अधिवक्ता अहमद जमाल यांच्या माहितीनुसार, सरकारी आकडेवारीपेक्षा कितीतरी अधिक संख्येने नागरिक विदेशात गेले आहेत. तरुणच नव्हे, तर ४० ते ६० या वयोगटातील नागरिकही विदेशात जात आहेत.

३. पाकिस्तानमध्ये महागाईचे प्रमाण २७.६ इतके आहे. तसेच प्रत्येक नागरिकाचे वार्षिक उत्पन्न केवळ १ सहस्र ६५८ डॉलरपर्यंत (४ लाख ८ सहस्र पाकिस्तानी रुपये) खाली आले आहे. तज्ञांच्या मते देशातील युवकांना त्यांचे भविष्य अंधकारमय झाल्याचे दिसू लागल्याने ते पाक सोडून विदेशात जात आहेत.

४. पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणांच्या घटनाही वाढल्यामुळे नागरिक विदेशात जात आहेत. गेल्या वर्षी विदेशात गेलेल्यांमध्ये ९० सहस्र नागरिक कुशल कामगार होते.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानी नागरिकच नाही, तर लवकरच भ्रष्ट राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याधिकारीही विदेशात पळून जाणार आहेत, हे उघड सत्य आहे !