नागपूर-मुंबई दुरांतोला आता १५ थर्ड एसी कोच आणि २ स्लीपर कोच ! : १५ जूनपासून निर्णयाची कार्यवाही !

नागपूर – मुंबई येथे जाण्यासाठी नागपूरकरांना सोयीच्या ठरणार्‍या नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसमध्ये प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून ९ थर्ड एसी कोचची संख्या १५ करण्यात येणार असून ८ स्लीपर कोचची संख्या २ होणार आहे. या निर्णयामुळे स्लीपर तिकीट उपलब्ध नसल्यास प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतील. १५ जूनपासून नवीन पालट अमलात येईल.

गाडी क्रमांक १२२९० नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये हा पालट १५ जूनपासून लागू होणार आहे. गाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर एक्सप्रेसमध्ये हा पालट १६ जूनपासून लागू होणार आहे. १७ फेब्रुवारीपासून सर्व आरक्षण केंद्रांवर, तसेच रेल्वेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षण करता येईल.

रेल्वे सुटण्याची वेळ रात्रीची असल्याने अनेकजण ‘स्लीपर कोच’चे तिकीट काढतात. स्लीपर कोचच्या तिकिटापेक्षा वातानुकूलित कोचचे शुल्क जवळपास ३ पटींनी अधिक आहे.

आय.आर्.सी.टी.सी. ॲपनुसार तिकीट शुल्क पुढीलप्रमाणे

१. स्लीपर : ६८५ रुपये (४५३ रुपये बेस फेअर, २० रुपये आरक्षण शुल्क, ३० रुपये सुपर फास्ट चार्जेस, १८२ रुपये डायनॉमिक चार्जेस)

२. एसी : १ सहस्र ८९० रुपये (१ सहस्र २२३ रुपये बेस फेअर, ४० रुपये आरक्षण शुल्क, ४५ रुपये सुपर फास्ट चार्जेस,  ४९० रुपये डायनॉमिक चार्जेस, ९० रुपये जी.एस्.टी.)