केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे घेतले दर्शन !

नागपूर, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. शहा यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेतले.

शहा आणि फडणवीस यांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. राजेंद्र गवई आदींनी शहा आणि फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह, शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्मृती मंदिराला भेट !

अमित शहा यांनी नागपूर येथील रेशीमबागमधील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी यांच्या समाधींचे दर्शन घेऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण केली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मोहन मते आणि आमदार प्रवीण दटके उपस्थित होते.