‘शिवसेना’ नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला !

  • केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !

  • ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही शिंदे गटाला मिळाले !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे, असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी या दिवशी दिला.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह यांवर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी चालू होती. त्यातच निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्याने शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी चालू आहे; मात्र याचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यापूर्वीच आयोगाने निर्णय दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. हा सत्याचा विजय आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा विचार ज्यांच्याकडे आहे, ती खरी शिवसेना ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय ही आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार ज्यांच्याकडे आहे, ती खरी शिवसेना आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम जे करतात, त्यांचीच शिवसेना आहे. ती कुणाची खासगी मालमात्ता नाही.

असत्यमेव जयते । – संजय राऊत

खासदार संजय राऊत

‘सत्यमेव जयते’ ऐवजी आता ‘असत्यमेव जयते’ असे करावे. निवडणूक आयोगाने आता लोकांचा विश्वासही गमावला आहे. निवडणूक आयोग किंवा मग अन्वेषण यंत्रणा असतील, त्या कुणाच्या तरी गुलाम असल्यासारख्या वागत आहेत. महाराष्ट्रातून शिवसेना संपवावी, यासाठी सगळा डाव रचला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आणि नवीन निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जाऊ.