भाजप सरकारकडून मंदिर आणि मठ यांच्या विकासासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद

कर्नाटकचा अर्थसंकल्प !

रामनगर येथे भव्य श्रीराममंदिर बांधणार !

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात पुढील २ वर्षांत राज्यातील मठ आणि मंदिरे यांच्या विकासासाठी आणि जीर्णाेद्धारासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील रामनगर येथे भव्य श्रीराममंदिर बांधण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.

रामनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सी.एन्. अश्वथ नारायण यांनी गेल्या वर्षी डिसेंबर मासामध्ये मुख्यमंत्री बोम्माई यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या धर्तीवर रामनगरमधील रामदेवरा बेट्टा येथे ‘दक्षिण भारतातील अयोध्ये’च्या रूपात श्रीराममंदिर बांधण्यासाठी एका विकास समितीची स्थापना करण्याची मागणी केली होती.