हरियाणामध्ये चारचाकी गाडीमध्ये २ मुसलमानांना जिवंत जाळले !

मृतांच्या कुटुंबियांचा पोलीस आणि बजरंग दल यांच्यावर आरोप  

घटनास्थळ

रेवाडी (हरियाणा) – हरियाणातील भिवानी येथील लोहारू शहरात बोलेरो चारचाकी गाडीमध्ये जुनैद (वय ३५ वर्षे) आणि नसीर (वय २८ वर्षे) यांना जिवंत जाळण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर यावरून वाद चालू झाला आहे. जुनैद आणि नसीर हे दोघेही हरियाणा सीमेला लागून असलेल्या राजस्थानच्या भरपूर जिल्ह्यातील घाटमिका गावचे रहिवासी आहेत.

मृतांच्या कुटुंबियांनी आरोप करतांना म्हटले की, हरियाणातील फिरोजपूर झिरका येथील ‘क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’च्या (‘सीआयए’च्या) पोलीस पथकाने जुनैद आणि नसीर यांना त्यांच्या बोलेरो गाडीला धडक देऊन पकडले होते. यानंतर त्यांना घायाळ अवस्थेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडे स्वाधीन केले. त्यांना बजरंग दलाच्या लोकांनी गोवंश तस्करीच्या संशयावरून दोघांनाही अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्यांना बोलेरोसह जिवंत जाळले. संपूर्ण घटनेवेळी सीआयएचे पथक बजरंग दलासमवेत होते. बजरंग दलाचे सदस्य मोनू मानेसर, रिंकू सैनी फिरोजपूर-झिरका आणि इतर ७-८ जणांनी दोघांना गाडीत जिवंत जाळले.

पोलिसांनी आरोप फेटाळले !

फिरोजपूर झिरकाचे सीआयए प्रभारी वीरेंद्र सिंह म्हणतात की, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांनी ना आरोपी पकडले, ना बजरंग दलाच्या कह्यात दिले.

या घटनेशी माझा संबंध नाही ! – मोनू मानेसर याचे स्पष्टीकरण

या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मोनू मानेसर पसार झाल्याचे म्हटले जात आहे. तो हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील मानेसर येथील रहिवासी आहे. तो हरियाणाच्या बजरंग दलाचा गोसंरक्षण प्रमुख आहे. ‘भिवानी येथील घटनेशी माझा काहीही संबंध नाही. मला बलपूर्वक अडकवले जात आहे. घटनेच्या वेळी मी एका हॉटेलमध्ये होतो’, असा दावा मोनू याने एक व्हिडिओ प्रसारित करून केला आहे.