नाणीज येथे गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा
नाणीज (रत्नगिरि) – भगवंताने सजीवांच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी पृथ्वी, आप, तेज वायू आणि आकाश या पंचतत्त्वाची निर्मिती केली. भगवंत ही पंचतत्त्वे जीवसृष्टीला विनामूल्य आणि अविरतपणे देत आहे. त्यातील मानवाचा हस्तक्षेप थांबवून या पंचतत्त्वाची जपणूक झाली पाहिजे आणि हे समजून सांगण्यासाठी सद्गुरूंंची आवश्यकता असते, असा उपदेश जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केला.
आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज जयंती व संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन वारी महोत्सव –
(सौजन्य : जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ कोल्हापूर)
नाणीज क्षेत्री २ दिवस संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांची जयंती असा संयुक्त सोहळा झाला. त्याचा समारोप जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचनाने झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पुढे म्हणाले,
१. पंचतत्त्व विनामूल्य मिळत असतांना ज्या ज्या तत्त्वात माणसाने हस्तक्षेप केला, ते सर्व आता महाग झाले आहे. पाणी, प्राणवायू, वीज, भूमी, रहाती घरे या गोष्टी माणसांमुळे महाग झाल्या आहेत.
२. भगवंत विनामूल्य देतो; मात्र त्याची कुणाला किंमत नाही. या पंचतत्वात माणूस अविचाराने हस्तक्षेप करून पर्यावरण प्रदूषित करत आहे. काही शहरांत श्वास घेणेही अवघड झाले आहे.
३. पाणी हे जीवन आहे. ते जपून वापरले पाहिजे; कारण जलसाठे संपत चालले आहेत. ; पावसाचे पाणी भूमीत जिरवले पाहिजे.
४. शेतकर्यांच्या कष्टामुळे आपल्याला अन्न मिळते. वायूचे महत्त्व आपल्याला कोरोना काळात समजले.
५. संत तुकाराम यांनी ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरें वनचरें’ म्हटले आहे. त्याच झाडांची माणूस कत्तल करतोय. हे सारे जपले पाहिजे.
६. सद्गुरु ज्ञान देतात. सन्मार्ग दाखवतात. अलभ्य असा मानवदेह पूर्वपुण्याईने लाभला आहे. तो देव आणि मानवता यांच्या सेवेसाठी समर्पित करा.