संरक्षण क्षेत्रात स्‍वयंपूर्णतेचे पाऊल !

‘आत्मनिर्भर’ भारत !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वर्ष २०२३-२४ च्‍या अर्थसंकल्‍पात संरक्षण क्षेत्रासाठी प्रावधान केलेल्‍या १ लाख ६२ सहस्र कोटी रुपयांपैकी एक लाख कोटी रुपये देशांतर्गत बनवण्‍यात येणार्‍या उपकरणांसाठी राखीव ठेवले आहेत. केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रासाठी प्रत्‍येक वेळी आर्थिक तरतूद वाढवत असून वर्ष २०१९-२० मध्‍ये ५८ टक्‍के, वर्ष २०२१-२२ मध्‍ये ६४ टक्‍के, तर २०२२-२३ मध्‍ये ६८ टक्‍के इतक्‍या मोठ्या प्रमाणात रक्‍कम स्‍वदेशी गुंतवणुकीसाठी राखीव ठेवली. संरक्षणक्षेत्रात उपकरणनिर्मिती, तसेच संशोधन करण्‍यात आता अनेक खासगी आस्‍थापनेही रस दाखवत आहेत. यामुळे आता केवळ देश स्‍वयंपूर्ण होत आहे, असे नाही, तर वर्ष २०२४-२५ मध्‍ये स्‍वदेशी बनावटीची युद्ध उपकरणे निर्यात करण्‍याचे लक्ष्य ठेवण्‍यात आले आहे. हे प्रत्‍येक भारतियासाठी अभिमानास्‍पद आहे.

काँग्रेसचे संरक्षण क्षेत्राकडे अक्षम्‍य दुर्लक्ष !

देशाला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘देशाच्‍या सीमा आखून घ्‍या. त्‍यांना तारांचे कुंपण घाला आणि संरक्षण क्षेत्रात स्‍वयंपूर्ण होण्‍यासाठी प्रयत्न करा’, अशा २ महत्त्वपूर्ण सूचना केल्‍या होत्‍या; मात्र काँग्रेसने त्‍याकडे लक्ष दिले नाही. भारताने स्‍वातंत्र्यानंतर गेली अनेक वर्षे स्‍वदेशी युद्धनौका, लढाऊ विमाने परकीय देशांकडून आयात केली. संरक्षण क्षेत्रात आपण स्‍वयंपूर्ण नसल्‍याने भारताला नेहमी रशिया किंवा अमेरिका यांच्‍यावरच तंत्रज्ञान आणि उपकरणे यांसाठी विसंबून रहावे लागते. रशियाकडून घेतलेली ‘मिग विमाने’ मात्र ‘उडत्‍या शवपेट्या’च ठरल्‍या. १०० कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्‍या मिग विमानांचे सातत्‍याने अपघात झाले. त्‍यामुळे भारताची सहस्रो कोटी रुपयांची आर्थिक हानी तर झालीच; पण आपण १०० हून अधिक चांगले-प्रशिक्षित वैमानिक गमावले. सातत्‍याने होणार्‍या अपघातांमुळे जागतिक स्‍तरावर भारताची नाचक्‍की झाली, ती वेगळीच ! त्‍यामुळे जे पुष्‍कळ पूर्वीच होणे आवश्‍यक होते, ते आता भाजप सरकारच्‍या काळात होत आहे, हेही नसे थोडके !

अग्रक्रमाने वाटचाल !

गेल्‍या काही वर्षांत ‘आय.एन्.एस्.’ विक्रांत ही स्‍वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका, ‘हिंदुस्‍थान एअरोनॉटिक्‍स’ने सिद्ध केलेले ‘प्रचंड’ हे हलके लढाऊ हेलिकॉप्‍टर जे भूमीवर आणि हवेत अचूक आक्रमण करू शकते, नव्‍या तंत्रज्ञानाचे आकाश क्षेपणास्‍त्र, खासगी आस्‍थापनांकडून सैनिकी विमानांचे उत्‍पादन असणारा प्रकल्‍प (२१ सहस्र ३९५ कोटी रुपये), ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संशोधन वाढवण्‍यासाठी विद्यापिठे, संशोधन आणि विकास प्रयोगशाळा वाढवणे यांसह अनेक नाविन्‍यपूर्ण प्रकल्‍पांचा समावेश आहे. भारत हा असा देश आहे की, जागतिक स्‍तरावरील बुद्धीमत्ता आणि संशोधनक्षमता अशा दोन्‍ही प्रकारच्‍या क्षमता असलेले मनुष्‍यबळ आपल्‍याकडे आहे; मात्र काँग्रेसच्‍या कार्यकाळात त्‍याला कधी वावच मिळाला नाही.

गेल्‍याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील तुमकुरु येथे हिंदुस्‍थान एअरोनॉटिक्‍स लिमिटेड (एच्.ए.एल्.) यांनी सिद्ध केलेला हेलिकॉप्‍टर कारखाना देशाला समर्पित केला. ६१५ एकर क्षेत्रात असलेल्‍या या कारखान्‍यात प्रत्‍येक वर्षी ३० हेलिकॉप्‍टर सिद्ध होणार असून पुढे ९० च्‍या संख्‍येचे लक्ष ठेवण्‍यात आले आहे.

गेल्‍या ८ वर्षांत केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात सुधारणा करतांना ते शक्‍तीशाली कसे होईल ?, याकडेही लक्ष दिले आहे. संरक्षण क्षेत्र स्‍वयंपूर्ण होण्‍यात ‘एच्.ए.एल्.’चा मोठा वाटा आहे. ‘एच्.ए.एल्.’ आता भारतीय सैन्‍यासाठी अत्‍याधुनिक ‘तेजस’ बनवत आहे, ते जगातील एक शक्‍तीशाली विमान असेल !

सतर्कता हवीच !

वर्ष १९९० च्‍या दशकात इस्रोचे शास्‍त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी क्रायोजेनिक इंजिन सिद्ध केले. त्‍या काळात हे संशोधन पुढे गेले असते, तर अंतराळक्षेत्र, संरक्षणक्षेत्र, तसेच अनेक क्षेत्रांत भारत आधीच स्‍वयंपूर्ण झाला असता. त्‍या वेळी विदेशी कटकारस्‍थानांना आपली यंत्रणा बळी पडली आणि नंबी नारायणन् यांना खोट्या आरोपाखाली अटक झाली. येथे केवळ ‘एका शास्‍त्रज्ञाचा बळी गेला’, असे नाही, तर भारत संशोधन क्षेत्रात अनेक वर्षे मागे फेकला गेला. आताही भारत स्‍वयंपूर्ण होत होत एक पाऊल पुढे जात आहे, तर चीन, अमेरिका यांना ते निश्‍चित अस्‍वस्‍थ करणारे आहे. त्‍यामुळे आता आपण विशेष दक्षता घेतली पाहिजे.

गेल्‍या काही वर्षांत सेनादलांतील महत्त्वपूर्ण पदांवर असलेल्‍या अधिकार्‍यांची ‘हनी ट्रॅप’ची प्रकरणे समोर येत आहेत. सैन्‍याधिकार्‍यांना प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून त्‍यांच्‍याकडून अंतर्गत महत्त्वपूर्ण माहिती काढून घेणार्‍या विषकन्‍यांची अनेक ठिकाणी पेरणी झालेली आहे. त्‍यामुळे स्‍वयंपूर्ण होतांना तेथील अधिकारीवर्ग हाही भ्रष्‍टाचारापासून मुक्‍त, देशाशी एकनिष्‍ठ, तसेच चारित्र्यवान कसा राहील, याकडेही लक्ष देणे अत्‍यावश्‍यक आहे.

स्‍वयंपूर्णता अत्‍यावश्‍यक !

रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनचा बलाढ्य मित्र असलेल्‍या अमेरिकेसह अन्‍य अनेक देश त्‍यांना प्रत्‍यक्षात फार काही साहाय्‍य करू शकले नाहीत. सध्‍याची एकूण आंतरराष्‍ट्रीय परिस्‍थिती पहाता कधीही तिसर्‍या महायुद्धाला तोंड फुटू शकते, अशी स्‍थिती आहे. अशा स्‍थितीत कोणताही देश अन्‍य कुणाला साहाय्‍य करण्‍याच्‍या स्‍थितीत नाही. अशा प्रसंगी कोणत्‍याही प्रकारच्‍या आक्रमणाला तोंड देण्‍यासाठी आपणच स्‍वयंपूर्ण होणे अत्‍यावश्‍यक आहे. जो स्‍वयंपूर्ण आणि शक्‍तीशाली असतो, त्‍याच्‍यापासून इतरही वचकून असतात. त्‍यामुळे यापुढील काळात जागतिक स्‍तरावर आपले नेतृत्‍व सिद्ध करण्‍यासाठी भारताने प्रयत्न करावेत !

तिसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण होणे अतिशय महत्त्वाचे !