महाशिवरात्रीनिमित्तच्या विशेष भक्तीसत्संगात शिवाचे धीरगंभीर, आनंददायी आणि निर्गुण रूप अनुभवायला येणे

१८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने..

‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष भक्तीसत्संग झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. हवेत पुष्कळ गारवा जाणवणे आणि निर्गुणतत्त्व अधिक प्रमाणात जाणवणे

सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर

‘मी भक्तीसत्संग ऐकत असलेल्या ठिकाणी मला हवेत पुष्कळ गारवा जाणवत होता. ‘शिवतत्त्व हळूहळू जागृत होऊन कार्यरत झाले’, असे मला जाणवले. या भक्तीसत्संगाच्या वेळी मला ध्यानावस्था अधिक जाणवून निर्गुणतत्त्वाची अनुभूती अधिक प्रमाणात आली.

२. भक्तीसत्संगात कैलास पर्वताचे छायाचित्र दाखवत असतांना ‘ॐ’चा नाद ऐकू येणे

भक्तीसत्संगात शिवाशी संबंधित माहिती सांगत असतांना विविध छायाचित्रे दाखवली. ती छायाचित्रे पहात असतांना ‘मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहे’, असे मला जाणवले. कैलास पर्वताविषयी ऐकतांना मी तेथील वातावरण अनुभवत होते. ‘यापूर्वीही मी तेथे होते आणि आताही तेथेच आहे’, अशी काळाशी संबंधित वेगळी अनुभूती भगवंताने मला दिली. मला पुष्कळ वेळ ‘ॐ’चा नाद ऐकू येत होता. मानस सरोवराचे छायाचित्र पहात असतांना त्यातील जल स्थिर दिसत होते. तेथे निर्माण होत असलेल्या ‘ॐ’काराच्या सूक्ष्मलहरी त्यात तरंगस्वरूपात मधून मधून दिसत होत्या.

३. भक्तीसत्संगाच्या वेळी लावलेले सतारीचे पार्श्वसंगीत आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमयी (सुमधुर) आवाज ऐकतांना माझे मन अत्यंत शांत झाले होते. वातावरणावरही त्याचा सखोल परिणाम होत होता.

४. डमरूचा धीरगंभीर नाद ऐकून ‘वातावरणात शिवतत्त्व पूर्ण भरून राहिले आहे’, असे मला जाणवत होते.

५. ‘शिवस्वरूप गुरुतत्त्व आणि साधक ‘आनंद तांडव’ नृत्य करत आहेत’, असे जाणवणे

मला सगळीकडे पांढरा प्रकाश दिसत होता. ‘गुरुस्वरूपातील शिवतत्त्व जागृत होऊन ते तत्त्व निसर्गात ‘आनंद तांडव’ नृत्य करत आहे’, असे मला जाणवले. ‘आनंद तांडव’ हे शिवाचे नृत्य आहे. त्या नृत्यातून आत्मा शिवस्वरूपाचा आनंद घेत असतो. सत्संगाला उपस्थित साधकांच्या ठिकाणी मला पांढरे गोळे दिसले. ‘ते या आनंद तांडव नृत्यात सहभागी झाले आहेत’, असे मला दिसले.

६. मला अशी अनुभूती प्रथमच आली. ‘समुद्रकिनारी नृत्य करतांना काय जाणवते ?’, याचा अभ्यास करतांना मी शिवाचे निर्गुण आणि व्यापक रूप अनुभवले होते. या भक्तीसत्संगाच्या वेळी मला शिवाचे धीरगंभीर, आनंददायी आणि निर्गुण रूप अनुभवायला मिळाले.’

– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक