आज १५ फेब्रुवारी २०२३ (माघ कृष्ण नवमी) या दिवशी तानाजी मालुसरे बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…
‘माघ कृष्ण नवमी या दिवशी छत्रपती शिवरायांचा विश्वासू सेवक तानाजी मालुसरे हे कोंढाणा किल्ला सर करत असता धारातीर्थी पडले. आपला भाऊ सूर्याजी, वृद्ध शेलारमामा आणि निवडक ३०० मावळे यांसह तानाजी माघ कृष्ण नवमीच्या काळोख्या रात्री कोंढाण्याच्या पायथ्याशी आले. किल्ल्यावर बंदाेबस्त चोख असून उदयभान नावाचा राजपूत राठोड तेथील अधिकारी होता. कोंढाणा हस्तगत करणे, हे कष्टाचेच काम होते. तानाजीने सैन्याचे २ गट करून स्वतः एका गटासह अवघड वाटेने घोरपडीच्या साहाय्याने किल्ल्यावर चढले आणि तेथून दोर सोडून सहकार्यांना त्याने किल्ल्यावर घेतले. किल्ल्यावरील शत्रूला चाहूल लागून ते सावध झाले आणि लढाईस प्रारंभ झाला. मोठ्या निकराचे युद्ध झाले. थोड्याच वेळात ५० मावळे आणि ५०० राजपूत ठार झाले अन् तानाजी आणि उदयभान यांची समोरासमोर गाठ पडून द्वंद चालू झाले. एकमेकांवर वार करत असतांना दोघेही गतप्राण झाले. तानाजी धारातिर्थी पडले, तेव्हा मावळे परत फिरणार तो सूर्याजी कल्याण दरवाजाने मावळ्यांना घेऊन आला. मराठ्यांना हुरूप चढला. ८० वर्षांच्या शेलारमामांनी अनेक राजपूतांची हत्या केली. गड कह्यात आला. संकेतानुसार किल्ल्यावर गंजी (गवत) पेटवून शिवरायांना ही विजयाची वार्ता कळवण्यात आली. छत्रपती शिवरायांना आनंद झाला. दुसर्या दिवशी तानाजीच्या पतनाची हकीगत समजली, तेव्हा अत्यंत दुःख होऊन ते उद्गारले, ‘‘गड आला पण सिंह गेला !’’
विशेष आणि योगायोगाचे, म्हणजे माघ कृष्ण नवमी तिथीच्या दिवशी सुमारे १५० वर्षांनंतर सिंहगड इंग्रजांच्या कह्यात गेला.
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))