हिंदु राष्ट्रासाठी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याकडून ७ दिवसांच्या यज्ञाला प्रारंभ

हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन !

छतरपूर (मध्यप्रदेश) – येथील गडा गावातील बागेश्‍वर धाम या तीर्थक्षेत्री पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांनी १३ फेब्रुवारीपासून भारताला हिंदु राष्‍ट्र बनवण्‍यासाठी यज्ञ करण्‍यास प्रारंभ केला आहे. पुढील ७ दिवस हा यज्ञ चालणार आहे. ‘या ठिकाणी येऊन हिंदु राष्‍ट्रासाठी प्रार्थना करा’, असे आवाहन धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांनी केले आहे.

१. धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री या वेळी म्‍हणाले की, आम्‍ही भारतीय सनातनी लोक आहोत. आमची आमचे देव आणि आराध्‍य देवता यांवर श्रद्धा आहे. जेव्‍हा आम्‍ही त्‍यांच्‍याकडे याचना करतो, तेव्‍हा देव आम्‍हाला भरभरून देतो. जेव्‍हा कोट्यवधी हिंदु महायज्ञामध्‍ये हिंदु राष्‍ट्राची याचना करतील, तेव्‍हा भारत हिंदु राष्‍ट्र बनेल.

३. हिंदु राष्‍ट्र बनले, तर एकता होईल, सामाजिक सौहार्द वाढेल, जाती असतील; मात्र जातीवाद नसेल. भारताला स्‍वच्‍छ बनवा आणि स्‍वतःमधील जी घाण आहे, ती नष्‍ट करा, असे आवाहनही धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांनी केले.

२. एका मुलाखतीत त्‍यांना राजकारणाविषयी विचारले असता धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री म्‍हणाले की, राजकारण ‘पत्नी’ आहे, तर धर्म ‘पती’ आहे.

देवतांचा अवमान करणार्‍या चित्रपटांना विरोध करत रहाणार !

वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांनी चित्रपटांतून देवतांच्‍या होणार्‍या अवमानाला विरोध केला. आमीर खान यांच्‍या चित्रपटाविषयी ते म्‍हणाले की, ‘पीके’ चित्रपटामध्‍ये भगवान शंकराचा वेश केलेल्‍या कलाकाराला प्रसाधनगृहात बंद करण्‍यात आल्‍याचे दाखवले, हे योग्‍य आहे का ? ज्‍यांच्‍यावर आमची श्रद्धा आहे, त्‍यांच्‍याविषयी असे करणे योग्‍य आहे का ? जर अशा गोष्‍टींविषयी बोलणे विरोध आहे, तर आम्‍ही मरेपर्यंत विरोध करत राहू.

देश राज्यघटनेद्वारे चालतो ! – काँग्रेस नेते कमलनाथ

काँग्रेस नेते कमलनाथ

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी आयोजित केलेल्या यज्ञाच्या स्थळी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भेट दिली. त्यांनी या वेळी बागेश्वर धाममधील श्री बालाजी हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या नंतर पत्रकारांनी कमलनाथ यांना प्रश्न विचारला की, येथे भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी यज्ञ करण्यात येत आहे. त्यावर कमलनाथ म्हणाले की, भारत राज्यघटनेद्वारे चालतो. (याच राज्यघटनेत काँग्रेसने आणीबाणीच्या काळात हुकूमशाही पद्धतीने ‘पंथनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’, असे शब्द घुसवले. जर आता याच राज्यघटनेत संसदेत प्रस्ताव संमत करून हे दोन्ही शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ घातले, तर कमलनाथ काय बोलणार आहेत ? – संपादक)