साधकांनो, आपत्काळ हा साधनेसाठी सुवर्ण संधीकाळ असून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना शरण जाऊन शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या ! – प.पू. दास महाराज

प.पू. दास महाराज यांचा साधकांना संदेश…

पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांचा माघ कृष्ण सप्तमी (१३.२.२०२३) या दिवशी ८१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपत्काळाविषयी त्यांनी दिलेला संदेश आणि साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक

प.पू. दास महाराज यांच्या चरणी ८१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. सनातन संस्थेच्या साधकांना साक्षात् मोक्ष देणारा श्रीमन्नारायणच गुरु म्हणून लाभला असल्याने साधक भाग्यवान असणे

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम् ।

मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ।। – गुरुगीता, श्लोक ७६

अर्थ : ध्यानाचे आधारस्थान गुरुमूर्ती होय. पूजेचे मूलस्थान गुरुचरण, मंत्राचे उगमस्थान गुरुवाक्य आणि मोक्षाचा मूलाधार गुरूंची कृपा होय.

‘सध्याचा काळ हा संधीकाळ आहे; मात्र साधकांसाठी हा सुवर्ण संधीकाळ आहे. या सुवर्ण संधीकाळातील गुरुपौर्णिमा आपण नुकतीच साजरी केली. त्या दिवशी साधकांनी गुरूंप्रती कृतज्ञताही व्यक्त केली; परंतु गुरुकृपायोगानुसार साधना करणा‍र्‍या साधकांसाठी क्षणोक्षणी कृतज्ञतेचा भाव जागृत असणे आवश्यक आहे. वरील श्लोकामध्ये ‘गुरु हेच मोक्षाचे मूळ आहे’, असे म्हटले आहे. गुरुकृपेची महती प्राचीन काळापासून गायली जाते. अगदी भगवान शंकरानेसुद्धा ‘गुरुगीता’ सांगून गुरूंची महती गायली आहे. पूजनातही देवांच्या आधी गुरूंना स्थान दिले आहे. आम्हा सनातन संस्थेच्या साधकांना, तर साक्षात् मोक्ष देणारा श्रीमन्नारायणच गुरु म्हणून लाभला आहे. आमचे भाग्य किती थोर आहे !

२. सच्चिदानंद परब्रह्माने डॉ. जयंत आठवले यांचे अवतारी रूप धारण करून ‘गुरुकृपायोग’ हा साधनेचा मार्ग दाखवल्याने साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होत असणे

प्रत्येक युगाची साधना ठरलेली आहे. युग कुठलेही असले, तरी ही साधना करवून घेणारे शेवटी गुरुच असतात. आता कलियुगातील सहावे कलियुग संपत आले आहे. या घोर कलियुगातील जिवांचा उद्धार व्हावा, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म, हे डॉ. जयंत आठवले यांचे रूप धारण करून पृथ्वीतलावर अवतरले आहेत. या अवतारकार्यात ‘साधकांना शीघ्र गतीने मोक्ष प्राप्त व्हावा’, यासाठी त्यांनी ‘गुरुकृपायोग’ हा मार्ग दाखवला. या योगमार्गाने गेल्यास शिष्याचे परम कल्याण निश्चित आहे, हे आपण गेली कित्येक वर्षे अनुभवत आहोत. याच मार्गानुसार साधना करून अनेक जिज्ञासू साधक बनले आणि साधक शिष्यत्वाला पोचले आहेत. अनेक साधक संतपदी विराजमान झाले आहेत, तसेच त्यातील काही जण सद्गुरुपदी आणि अगदी परात्पर गुरुपदीही पोचले आहेत. अशा प्रकारची अन्य योगमार्गांनी विहंगम आध्यात्मिक उन्नती झालेली उदाहरणे अतिशय दुर्मिळ आहेत.

३. अनन्य श्रद्धा असेल, तरच संतांकडून संक्रमित झालेली आत्मशक्ती प्राप्त होऊन आत्मदर्शन घडते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीच आत्मशक्ती संत आणि सद्गुरु यांच्या ठायी प्रकट होऊन अन्य साधकांचा उद्धार करत आहे; म्हणून साधकांनी संत आणि सद्गुरु जे मार्गदर्शन करत आहेत, त्यानुसार आचरण करावे. त्यासाठी विवेक वापरावा. विवेक सूक्ष्म बुद्धीने येतो. सूक्ष्म बुद्धी नसेल, तर सद्गुरु जे सांगतात, त्याचा योग्य अर्थ कळत नाही. अनन्य श्रद्धा नसेल, तर परमेश्वराची संगत लाभली, तरी त्याच्या स्वरूपाचे आकलन होत नाही. जो जीव प्रज्ञावंत आणि

श्रद्धावंत असतो त्याला संतांकडून संक्रमित झालेली आत्मशक्ती ग्रहण होते आणि त्याची प्रतिभा जागृत होऊन त्यास आत्मदर्शन घडते. ‘मी देह आहे’, ही भावना नाश पावली की, सत्संगाचा खर्‍या अ‍र्थाने लाभ होतो. अशा साधकाला लवकर उत्तम गती लाभते.

४. आपत्काळात साधकांना समाजाचे नेतृत्व करायचे असल्याने त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी अखंड दक्ष रहावे !

साधकांनी ‘गुरुकृपायोगा’चे महत्त्व लक्षात घेऊन आपली प्रगती साधून घ्यावी. आता आपत्काळ चालू झाला आहे. काही दिवसांत त्याची तीव्रता वाढेल. हे जरी सत्य असले, तरी हा संधीकाळ आहे, म्हणजे साधनेसाठी सुवर्ण संधीकाळ आहे, हेही तितकेच सत्य आहे. तीव्र आपत्काळात आर्थिक विवंचना वाढतील. सामाजिक स्तरावर घोर चिंता लावणारे, मन खिन्न करणारे आणि भीतीदायक प्रसंग घडतील. अशा वेळी साधकांना समाजाचे नेतृत्व करायचे आहे. ही साधकांची समष्टी साधना आहे. ‘गुरुकृपायोगात समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे’, हे लक्षात ठेवून ध्येयाविषयी जागरूक रहावे. पुष्कळ श्रम करण्याची सिद्धता असावी. साधकांनी व्यष्टी साधनेची घडी नीट बसवावी. अशा काळात ‘पूर्वग्रहदूषितपणा यांसारखे घातक स्वभावदोष आणि अहंचे पैलू उफाळून येणार नाहीत’, यासाठी अखंड दक्ष रहावे.

५. साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरणागतभावाने करावयाची प्रार्थना

घोर आपत्काळातही साधनामार्गावर स्थिर रहाता यावे आणि विकल्पविरहित उपासना घडावी, यासाठी आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरणागतभावाने पुढील प्रार्थना करावी. ‘हे गुरुदेवा, या भीषण आपत्काळातील सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती आम्हा साधकांना प्रदान करा. आम्हा साधकांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती करवून घ्या. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी आपण सांगितलेल्या मार्गाने आम्ही जात आहोत. त्यात आम्हाला यश लाभू दे. आम्हाला तुमच्या कोमल चरणी स्थान द्या.’

– प.पू. दास महाराज,‍ पानवळ, बांदा, सिंधुदुर्ग. (१८.७.२०२२)


या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.