‘डॉ. आंबेडकर जिवंत असते, तर मी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असत्या’ म्हणणार्‍या दलित नेत्याला अटक

‘रिडल्स इन हिंदुइझम्’ पुस्तकातून डॉ. आंबेडकर यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

उजवीकडे हमारा प्रसाद

नवी देहली – तेलंगाणामध्ये ‘राष्ट्रीय दलित सेना’ नावाची संघटना चालवणारे नेते हमारा प्रसाद यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. हमारा प्रसाद यांनी या व्हिडिओत डॉ. आंबेडकर यांचे एक पुस्तक हातात घेत म्हटले होते की, डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या ‘रिडल्स इन हिंदुइझम्’ (हिंदु धर्मातील कोडे) या पुस्तकामध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ज्याप्रमाणे नथुराम गोडसे यांनी म. गांधी यांना जसे मारले, तसे मी डॉ. आंबेडकर यांना गोळ्या झाडून मारले असते.

हमारा प्रसाद यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर बहुजन समाज पक्षाचे तेलंगाणा शाखेचे प्रमुख आर्.एस्. प्रवीण कुमार यांनी हा व्हिडिओ शेअर करत प्रसाद यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.