जळगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा वाचून दाखवण्यात आलेला संदेश
‘मंदिरात साक्षात् भगवंताचा वास असल्याने त्याला ‘देवस्थान’ म्हणतात. देवळातील नित्य पूजा, अभिषेक इत्यादी धार्मिक विधींच्या वेळी, तसेच आरतीच्या वेळी साक्षात् देवतेचे चैतन्य प्रक्षेपित होत असते. त्यामुळे मंदिरे ही हिंदूंसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी चैतन्यस्रोत आहेत. अनेकांना मंदिरांत गेल्यानंतर मनःशांतीचा अनुभव होतो. यासाठी मंदिरांचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक आहे.
आजकाल काही मंदिरांचे व्यवस्थापन आणि धनाचा विनियोग यांचे कारण सांगून सरकार त्यांचे अधिग्रहण करत आहे. सर्वच महत्त्वाच्या मंदिरांवर शासकीय प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आदींना विश्वस्त म्हणून नेमण्यात आले आहे. खरे तर मशिदी किंवा चर्च यांवर सरकारी प्रशासक नेमल्याचे किंवा त्यांचे अधिग्रहण झाल्याच्या वार्ता कधीच ऐकू येत नाही. मंदिरांमध्ये सरकारी प्रतिनिधी आले की, प्रथा-परंपरांवर प्रतिबंध येतात, देवनिधीमध्ये भ्रष्टाचार होतो, अन्य पंथीय कर्मचारी ठेवले जातात. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल, तर देवभक्त हिंदूंनी मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. देवभक्तांनो, धर्मनिरपेक्ष सरकारच्या नियंत्रणातून धर्ममय मंदिरांना मुक्त करणे, हे धर्मसंस्थापनेचे कार्य आहे, हे लक्षात घ्या !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था