प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करून बनवलेला जॅकेट घालून पंतप्रधान मोदी पोचले संसदेत !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ फेब्रुवारी या दिवशी संसदेत फिकट निळ्या रंगाचे जॅकेट परिधान करून आले होते. हे जॅकेट कापडाचे नसून पुनर्वापर करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवण्यात आले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने बेंगळुरू येथील ‘इंडिया अ‍ॅनर्जी वीक’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांना हे जॅकेट भेट दिले होते.

पेट्रोल पंप आणि एल्पीजी एजन्सी यांठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी असा गणवेश बनवण्याची या आस्थापनाची योजना आहे. एक गणवेश बनवण्यासाठी एकूण २८ बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो. आस्थापनाने प्रतिवर्षी १० कोटी प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास साहाय्य होईल आणि पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल. या जॅकेटची बाजारातील किंमत २ सहस्र रुपये एवढी आहे.