गौतम अदानी यांची जगातील श्रीमंतीच्या यादीत १७ व्या स्थानावर झेप !

संपत्तीत होत आहे पुन्हा वाढ !

नवी देहली – अमेरिकेतील आस्थापन ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालात भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आर्थिक अपव्यवहाराचा आरोप करण्यात आल्यानंतर अदानी यांच्या उद्योग समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अदानी यांची संपत्ती निम्मी झाली, तसेच जगातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्तीवरून त्यांचे स्थान २१ व्या वर आले होते. आता पुन्हा त्यांच्या शेअर्सने उसळी घेण्यास प्रारंभ केला आहे. अदानी यांच्या संपत्तीत पुन्हा वाढ होऊ लागली असून ते २१ व्यावरून १७ व्या स्थानावर झेपावले आहेत.

अदानी एन्टरप्रायजेस, अदानी पोर्ट आणि अदानी पावर यांच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. अदानी यांच्या संपत्तीत अवघ्या तीन घंट्यांत ७.३१ टक्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच त्यांची संपत्ती ३ लाख ५५ सहस्र कोटी रुपयांनी वाढली. संपत्ती वाढीचा वेग अजूनही चालूच आहे.

अदानी यांच्यावरील आरोपांमागे आंतरराष्ट्रीय कट ?

गौतम अदानी भारतीय उद्योगपती असल्याने आणि त्यांची होत असलेली उत्तरोत्तर वाढ पहाता त्यांना लक्ष्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कट रचण्यात आल्याचा दावा आता केला जात आहे. यामुळेच की काय समाजात त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होऊन त्यांना पुन्हा आर्थिक समर्थन मिळू लागल्याने त्यांची पत वाढू लागल्याचे म्हटले जात आहे. सामाजिक माध्यमांतून अदानी यांच्या समर्थनार्थ पोस्ट केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.