भूकंपामुळे तुर्कीयेच्या अर्थव्यवस्थेला फटका

अंकारा (तुर्कीये) – आर्थिक संकटात असलेल्या तुर्कीयेमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तेथील चलन ‘लिरा’च्या मूल्यामध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेतील भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार तुर्कीये आणि सीरिया येथे झालेल्या भूकंपामुळे १ अब्ज डॉलरची (सुमारे ८ सहस्र कोटी रुपयांची) हानी झाल्याचा अंदाज आहे. जानेवारी २०२० मध्ये याच प्रदेशात ६.७ तीव्रतेच्या भूकंपामुळे सुमारे ४ सहस्र ९०० कोटी रुपयांची हानी झाली होती.

१. बीबीसीने त्याच्या वृत्तात एका तुर्कीयेतील महिलेचा हवाला देत म्हटले आहे की, गेल्या वर्षी ही महिला सुमारे १९ सहस्र ७०० रुपये घरभाडे देत होती. आता तिच्या घरमालकाने घरभाडे दुप्पट केले आहे.

२. इस्तंबूलमध्ये एक हॉटेलचे व्यवस्थापक एर्सिन फुआट उलकु म्हणाले की, आता तुर्कीयेमध्ये केवळ खूप श्रीमंत किंवा खूप गरीब लोकच आहेत. मध्यमवर्ग नाही. सरकारी साहाय्यनंतरही महागाईचा सामना करणे कठीण आहे. येथे भविष्य अंधारात आहे.

३. ‘आगामी काळात तुर्कीयेची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते’, असे म्हटले जाते; कारण ‘राष्ट्रपती एर्दोगन हे आर्थिक सिद्धांतांच्या विरुद्ध चालत आहेत. ते सातत्याने व्याजदरात कपात करत आहेत. इतर देशांच्या मध्यवर्ती बँका महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात वाढ करत आहेत’, असे जनतेकडून सांगितले जात आहे.