संघशक्‍ती निर्माण करणार्‍या शिक्षणाचे महत्त्व !

आपल्‍या देशातील शिक्षणव्‍यवस्‍था ही गुरुकुल पद्धतीची आहे. परकियांनी आक्रमण करून विशेषतः इंग्रजांनी आपली संपूर्ण शिक्षणव्‍यवस्‍था अंतर्बाह्य पालटली. त्‍यांना या देशात स्‍वतःची राजकीय सत्ता टिकवायची होती. ती राजकीय सत्ता टिकवण्‍याच्‍या हेतूने त्‍यांनी शिक्षणव्‍यवस्‍था आपल्‍या देशात निर्माण केली. ती निर्माण करतांना त्‍यांनी आपल्‍या भूमीत रुजलेली, तिला अनुकूल आणि समाजाच्‍या उत्‍कर्षासाठी उपयुक्‍त असलेली शिक्षणव्‍यवस्‍था मुळासकट उपटून टाकली. देश स्‍वतंत्र केल्‍यानंतर परकीय शिक्षणव्‍यवस्‍था नष्‍ट करून आपल्‍याला अनुकूल आणि हितकारक असलेली शिक्षणव्‍यवस्‍था आपण निर्माण केली नाही.

१. भारतीय शिक्षणव्‍यवस्‍था अंत:शिक्षणाचा (आंतरिक) पुरस्‍कार करणारी !

आपल्‍या सनातन, कालातीत शिक्षणव्‍यवस्‍थेचे महत्त्व आपल्‍या शासनकर्त्‍यांना उमगले नाही. परिणामी पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानावर आधारित आणि केवळ व्‍यावहारिक दृष्‍टीकोन ठेवून निर्माण करण्‍यात आलेली शिक्षणव्‍यवस्‍था आपण दत्तक घेतली. पाश्‍चात्त्य शिक्षणव्‍यवस्‍था ही केवळ बाह्य शिक्षणावर जोर देते. आपल्‍या भूमीत रुजलेली संपन्‍न शिक्षणव्‍यवस्‍था ही बाह्य शिक्षणासह अंत:शिक्षणाचा पुरस्‍कार करणारी आहे. किंबहुना अंत:शिक्षणावर अधिक भर देणारी आहे. बाह्य शिक्षण हे कितीही चांगले असले, तरी संस्‍कार महत्त्वाचे असतात. मानवाच्‍या संस्‍कारांचा प्रारंभ गर्भापासून होतो. टीप कागदाप्रमाणे मुले संस्‍कार ग्रहण करतात. लहानपणी झालेले संस्‍कार सहसा नष्‍ट होत नाहीत.

ज्‍या शिक्षणामुळे बुद्धी, स्‍मृती, मेधा आणि प्रज्ञा विकसित होते, त्‍याला अंत:शिक्षण म्‍हणतात. अन्‍नपदार्थाचा परिणाम ताटावर होत नाही, तर शरिरावर होतो. त्‍याप्रमाणे शिक्षणाचा परिणाम आचरणावर होतो. हे लक्षात घेऊन आपल्‍या ऋषीमुनींनी बाह्य शिक्षणासह अंत:शिक्षणाला महत्त्व दिले. किंबहुना अंत:शिक्षणाचा पाया बाह्य शिक्षणाला प्राप्‍त करून दिला.

२. खरे शिक्षण कोणते ?

श्री. दुर्गेश परुळकर

‘विद्यार्थ्‍यांना शिकवलेली गोष्‍ट त्‍यांनी लक्षात ठेवायची. त्‍यानंतर त्‍याने आपल्‍या शब्‍दात ती व्‍यक्‍त करायची’, हा स्‍मरणाचा महिमा आहे. विद्यार्थ्‍याला शिकतांना आनंद वाटला पाहिजे. शिक्षण ही शिक्षा आणि ओझेही वाटता कामा नये. ‘मुलांनो, पुस्‍तके उघडा’, हे शिक्षण नाही. ‘मन मोकळे करता येणे, मनात कपट भाव न ठेवणे, संकुचित वृत्तीला थारा न देणारे विशाल मन जे अनंताकडे झेप घेण्‍यास सामर्थ्‍य होईल’, अशा प्रकारचे मन घडवणारे खरे शिक्षण आहे.

आजचे शिक्षण केवळ परीक्षा, उद्योग, व्‍यवसाय आणि नोकरी यांसाठी आहे. या गोष्‍टी मानवी जीवनात महत्त्वाच्‍या असल्‍या, तरी तेवढ्यापुरतेच दिले जाणारे शिक्षण परिपूर्ण म्‍हणता येत नाही.

३. सध्‍याचे शिक्षण ‘अर्थपरायण’

विद्या जशी जीवनासाठी आहे, तशी ती ज्ञानासाठी सुद्धा आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या जीवन विकासाला प्राधान्‍य देणारी शिक्षणव्‍यवस्‍था असावी. पेपर लिहितांना मी कुणाचेही बघून लिहिणार नाही. त्‍याचबरोबर ‘मी अप्रामाणिकपणे वागून प्रश्‍नपत्रिका सोडवणार नाही’, ही वृत्ती निर्माण करणारी शिक्षणव्‍यवस्‍था अस्‍तित्‍वात नसल्‍यामुळे परीक्षेच्‍या वेळी निरीक्षकाची व्‍यवस्‍था करावी लागते. याचाच अर्थ आजचे शिक्षण ‘सेवापरायण’, ‘श्रद्धापरायण’, ‘ज्ञानपरायण’, ‘निष्‍ठापरायण’ नाही, तर ‘अर्थपरायण’ आहे. परिणामी ज्ञानलालसा असलेले विद्यार्थी अभावानेच आढळतात.

४. आताच्‍या शिक्षणातून उत्‍सव साजरे करण्‍याचे भान न मिळणे

आपला हिंदू समाज हा उत्‍सवप्रेमी आहे; पण हे उत्‍सव संयमाने साजरे केले जात नाहीत. उत्‍सव साजरे करतांना पावित्र्य, संयम, नैतिकता, सामाजिक भान राखले जात नाही. याचे कारणच मुळी केवळ बाह्य शिक्षणावर आधारित असलेली शिक्षणव्‍यवस्‍था आहे. विद्यापिठातून पदवी संपादन करून बाहेर पडणारा पदवीधर ज्ञानासक्‍त आणि व्रतस्‍थ होऊन बाहेर येत नाही. ‘ज्ञान मंदिरात विहित वेश परिधान करून प्रवेश करावा’, असा एक अलिखित नियम आपल्‍या संस्‍कृतीत आढळतो. तो ‘विद्या विनयेन न शोभते’, या संस्‍कृत वचनातून तो व्‍यक्‍त होतो.

५. मुलांना धर्मग्रंथ अभ्‍यासाला देण्‍याचे महत्त्व

जीवन विकासाची ३ अंगे सांगण्‍यात आली आहेत. ‘वाणी, तन आणि मन’, ही तिन्‍ही अंगे पुष्‍ट करणारी शिक्षणव्‍यवस्‍था गुरुकुलात अस्‍तित्‍वात होती. तेजस्‍वी विचारांनी माणूस तेजस्‍वी होतो. तेजस्‍वी वाङ्‌मयामुळे माणसाचे मन दृढ आणि सुदृढ होते. गीता, रामायण, महाभारत, उपनिषदे असे ग्रंथ आपण आपल्‍या मुलांना वाचायला आणि अभ्‍यासाला दिले पाहिजेत. त्‍यामुळे त्‍यांचे जीवन तेजस्‍वी होईल. हे सारे ग्रंथ जीवननिष्‍ठेचा ऊर्जा स्रोत आहेत.

६. विद्यार्थ्‍याना धार्मिक शिक्षण दिल्‍यामुळे होणारे लाभ

आज ‘धार्मिक शिक्षणा’चा उच्‍चार करताच चारही बाजूंनी विरोधाचे सूर निघतात. याचे कारण ‘धार्मिक शिक्षण’ याचा अर्थच नेमकेपणाने जाणला नाही. ‘ज्‍या शिक्षणात चरित्रनिष्‍ठा आणि ईशनिष्‍ठा, देह अन् आत्‍मा भिन्‍न आहेत, याचे ज्ञान मिळते’, त्‍याला धर्मशिक्षण म्‍हणतात. चरित्रनिष्‍ठा नसेल, तर मानवी जीवन अध:पतित होईल. ईशनिष्‍ठा मानसिक बळ देण्‍यास उपयुक्‍त ठरते. त्‍यामुळे मनाला निराशा स्‍पर्श करू शकणार नाही. त्‍यासह ज्ञानाचा, विद्येचा प्रचार आणि प्रसार करण्‍याचे बळ प्राप्‍त होते. मी प्राप्‍त केलेली विद्या जर दुसर्‍याला शिकवली नाही, तर तो अधर्म आहे. याची जाणीव मनात निर्माण होते. त्‍याप्रमाणे सहजतेने ज्ञान आणि विद्या यांच्‍या

प्रसाराचे कार्य अखंड अन् अविरत चालू रहाते. म्‍हणूनच संत नामदेव महाराज म्‍हणाले, ‘‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥’’ ज्ञानदीपाने तेजाळलेले विश्‍व निर्माण करण्‍याचे उच्‍च ध्‍येय छात्राला (विद्यार्थ्‍याला) विद्यालय आणि विद्यापीठ येथे देण्‍याची व्‍यवस्‍था आजच्‍या शिक्षणपद्धतीत नाही.

७. सध्‍याचे शिक्षण आत्‍मकेंद्रितपणा शिकवणारे

गुरुकुलातील शिक्षणपद्धतीत ‘आपण शिकत आहोत’, याची जाणीव न होता विद्यार्थी ज्ञान प्राप्‍त करतात. तिथेच त्‍यांना जीवन कसे जगायचे ? याचे शिक्षण मिळते. तेच खरे शिक्षण होय. आजचे शिक्षण आत्‍मकेंद्रित आहे. ‘मी’ आणि ‘माझे’ एवढाच विचार या शिक्षणपद्धतीमुळे केला जातो. त्‍यामुळे कर्मशून्‍य आणि जीवनशून्‍य तरुणांची पिढी आपण निर्माण करत आहोत.

८. शिक्षणातून व्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचा पुरस्‍कार करतांना झालेला अपराध

‘मानसिक, बौद्धिक आणि आत्‍मिक अशा प्रकारच्‍या सौंदर्याने जीवन सुखी बनते’, याचाच आपल्‍याला विसर पडला. मानसिक सौंदर्यासाठी बौद्धिक सौंदर्याची आवश्‍यकता असते. आत्‍मिक सौंदर्य हा अंत:सौंदर्याचा कळस आहे. हे आत्‍मिक सौंदर्य नसेल, तर सुंदरता प्राणहीन आणि निस्‍तेज आहे. अशी समज आणि शिकवण देणारी शिक्षणव्‍यवस्‍था समाज अन् राष्‍ट्र यांचा मूलाधार आहे. याकडेच आपले दुर्लक्ष झाले. ‘व्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचा पुरस्‍कार करतांना आपण मानसिक सौंदर्याकडे पाठ फिरवली’, हाच आपला अक्षम्‍य अपराध आहे.

९. आजच्‍या शिक्षणव्‍यवस्‍थेतील त्रुटी

आज प्रत्‍येक गोष्‍टीचे मूल्‍यांकन पैशात केले जाते. माणसाचा सन्‍मान, स्‍त्रीचे चारित्र्य, राष्‍ट्रभक्‍ती या आणि अशा गोष्‍टी अर्थाधिष्‍ठित आहेत का ? लोभाला आज मर्यादा राहिलेली नाही. कुटुंबसंस्‍था अबाधित रहावी, याकडे आपण लक्ष देत नाही. आदरभाव समाजातून नष्‍ट होत चालला आहे. समाजातील ज्ञान पूजा लोप पावत चालली आहे. आजच्‍या शिक्षणव्‍यवस्‍थेमुळे आपण ३ मूलभूत गोष्‍टी विसरून गेलो आहोत.

अ. अधिकाराचे रूपांतर कर्तव्‍यात करणे.

आ. अहंकार वृत्तीचे रूपांतर संयमात करणे.

इ. प्रतिस्‍पर्धीचे रूपांतर सहकारात करणे.

आज आपला कल श्रेय घेण्‍याकडे वाढला आहे. त्‍यामुळे ‘प्रत्‍येक व्‍यक्‍ती संघनिष्‍ठ असली पाहिजे’, हा आग्रह आपण धरत नाही. संघनिष्‍ठा समाजाला एकत्रित बांधून ठेवते. संघनिष्‍ठेसाठी व्‍यक्‍तीगत स्‍वार्थाचे बलीदान द्यावे लागते. त्‍यासाठी मानसिक सिद्धता आत्‍मिक बळ यांची आवश्‍यकता असते. ती मानसिक सिद्धता आणि आत्‍मिक बळ आजची शिक्षणव्‍यवस्‍था देऊ शकत नाही. ही आजच्‍या शिक्षणव्‍यवस्‍थेची त्रुटी आहे.

१०. मानवाचे अधःपतन टाळण्‍यासाठी धार्मिक ग्रंथांच्‍या अध्‍ययनाचे महत्त्व

महाभारतातून काही गोष्‍टी शिकण्‍यासारख्‍या आहेत. सत्‍य, न्‍याय, दुष्‍टांवर विजय प्राप्‍त करणे यांसाठी आपणच प्रसंगी आपली वचने, आपले शब्‍द, आपली तत्त्वे बाजूला सारली पाहिजेत. श्रीकृष्‍णाने हातात शस्‍त्र न धरण्‍याची प्रतिज्ञा घेतली होती. तरीसुद्धा प्रसंग येताच स्‍वतःची प्रतिज्ञा मोडीत काढली. अडचणीत आलेल्‍या कर्णाशी युद्ध चालू ठेवून अर्जुनाने स्‍वतःवर टीका करण्‍यासाठी जगाला मोकळीक दिली. असत्‍य न बोलण्‍याची प्रतिज्ञा युधिष्‍ठिराने केली होती; पण महाभारतीय युद्धात ‘नरो वा कुंजरो वा’, असे म्‍हणून आपल्‍या प्रतिज्ञेचा भंग करून त्‍याने धर्म पाळला.

अशा प्रकारे समाजहित, सत्‍य, न्‍याय प्रस्‍थापित करणे, दुष्‍टांना पराभूत करणे यांसाठी वेळ येताच आत्‍मसमर्पण, आत्‍मबलीदान, घेतलेल्‍या शपथा किंवा प्रतिज्ञा यांना तिलांजली देण्‍याची सिद्धता ठेवण्‍याचा भाग आजची शिक्षणपद्धती आपल्‍याला देत नाही. म्‍हणूनच आजचे शिक्षण घेत असतांनाही आपण गीता, उपनिषदे, वेद, रामायण, महाभारत, पौराणिक ग्रंथ, तत्त्वज्ञान या आणि अशा ग्रंथांचे अध्‍ययन करणे नितांत आवश्‍यक आहे. असे केले, तरच संघटितपणा, प्रतिकार आणि चरित्र यांच्‍याप्रती निष्‍ठा निर्माण होईल, अन्‍यथा आपले अध:पतन अटळ आहे. ते टाळण्‍यासाठीच संघशक्‍ती निर्माण करणार्‍या शिक्षणाचे महत्त्व जाणणे क्रमप्राप्‍त आहे. हे जाणून त्‍या दिशेने विद्यमान सरकार पावले उचलत आहे, ही कौतुकास्‍पद गोष्‍ट आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली (२५.१.२०२३)