कोल्हापूर, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – शासनस्तरावर ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता होण्यासाठी आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद गेली ४ वर्षे प्रयत्न करत आहे. यामुळेच खुल्या प्रवर्गासाठी ‘अमृत’ योजनेची स्थापना झाली असून प्राथमिक व्ययासाठी १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तरी अद्याप मार्गी न लागलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, तसेच विविध कामांचा आढावा घेण्यासाठी १२ फेब्रुवारी या दिवशी हॉटेल ‘ओपल’ येथे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्या वतीने ‘गोलमेज परिषद’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेच्या वतीने श्री. मकरंद कुलकर्णी आणि श्री. सूरज कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सर्वश्री प्रदीप अष्टेकर, विजय जमदग्नी, स्वानंद गोसावी, दिलीप धर्माधिकारी, कमलाकार देशपांडे उपस्थित होते.
(सौजन्य : channel B)
१. या परिषदेत समाजासाठी काम करणार्या ब्राह्मण समाजातील विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेसाठी साधारणत: २०० प्रतिनिधी उपस्थित रहातील.
२. ब्राह्मण समाजातील युवकांना आर्थिक आणि शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळावी, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक पूर्ण व्हावे, छत्रपती शाहू महाराज-अण्णाभाऊ साठे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळावे, समाजातील विद्यार्थ्यांना वसतीगृह मिळावे, पौरोहित्य करणार्यांना मानधन मिळावे यांसह परिषदेच्या मागण्या असून त्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा चालू आहे.
३. ‘अमृत योजने’ची स्थापना झाल्यानंतर त्यासाठी २० पदे संमत करण्यात आली आहेत; मात्र याचे कामकाज सध्या ठप्प असून या योजनेत संमत करण्यात आलेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. तरी शासनस्तरावर याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे.