अध्यात्मामुळे नैतिक मूल्ये जिवंत रहातात ! – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर

पुणे – सध्या मनुष्याचे मानसिक बळ अल्प होत असून एकमेकांमधील अंतर वाढत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी स्थानिक भाषेच्या माध्यमांनी नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करायला हवा, तसेच कामाच्या तणावांपासून दूर होण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. कारण अध्यात्मच नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे कार्य करते, असे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. सेनापती बापट मार्गावर हॉटेल मेरीएटमध्ये झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’च्या वतीने दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत, दैनिक ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार, ‘न्यूज १८ लोकमत’चे संपादक आशुतोष पाटील यांचा विशेष सन्मान केला. ‘माध्यमांनी व्यक्तींच्या केवळ चुका न दाखवता चांगले कार्य करणार्‍यांचाही सन्मान करायला हवा. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता या लोकशाहीच्या चार खांबांना अध्यात्माने जोडून ठेवले आहे. म्हणून जेथे अध्यात्म असेल, तेथे चांगले राजकारण होते’, असेही श्री श्री रविशंकर म्हणाले. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, ‘पुढारी’चे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, भारती इन्स्टिट्यूटचे संस्थापक, एस्.एन्.बी.पी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक, पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आणि प्रदेशाध्यक्ष किरण जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले, तर पंकज बिबवे यांनी आभार मानले.