पुणे येथे १ लाख विद्यार्थ्‍यांनी घेतली व्‍यसनमुक्‍तीची शपथ !

‘आर्ट ऑफ लिव्‍हिंग फाऊंडेशन’सह शहरातील शैक्षणिक संस्‍थांच्‍या वतीने झालेला ‘एज्‍युयुथ मीट’ कार्यक्रम

पुणे – ‘आर्ट ऑफ लिव्‍हिंग फाऊंडेशन’सह शहरातील शैक्षणिक संस्‍थांच्‍या वतीने झालेल्‍या ‘एज्‍युयुथ मीट’ या कार्यक्रमामध्‍ये ‘व्‍यसन करणार नाही आणि करूही देणार नाही’ अशी शपथ १ लाख विद्यार्थ्‍यांनी घेतली. या शपथ उपक्रमाची नोंद ‘लंडन बुक ऑफ वर्ल्‍ड’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्‍ये नोंद झाली. श्री श्री रविशंकर यांच्‍या उपस्‍थितीमध्‍ये शपथ कार्यक्रम साजरा झाला.

श्री श्री रविशंकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्‍यांमधील प्रतिभा जागृत करण्‍यासाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयोगी ठरेल. प्रत्‍येक विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्‍था आनंदाचे, नवनिर्मितीचे कॅम्‍पस झाले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरण हे क्रांतीकारी पाऊल आहे. तरुणाईच भारताला नशामुक्‍त करू शकते. त्‍यासाठी तरुणांनी उत्‍साह समवेत घेऊन चालायचे आहे. प्रत्‍येक गोष्‍टीतील आव्‍हानांचा सामना करतो तो युवा असतो. मानसिक स्‍वास्‍थ्‍यासाठी ध्‍यान आणि योग करा. जीवन गमावून आत्‍महत्‍या करू नका.

(सौजन्य : EduYouth Meet)

संपादकीय भूमिका 

दुःख पचवण्‍याची शक्‍ती नसल्‍याने व्‍यसनांच्‍या आहारी जाणार्‍या आजच्‍या पिढीसमोर १ लाख विद्यार्थ्‍यांनी व्‍यसनमुक्‍तीची शपथ घेऊन आदर्श निर्माण केला आहे ! सर्वच विद्यार्थ्‍यांनी याचे अनुकरण करून सक्षम व्‍हावे !